झेडपीच्या सर्वसाधारण सभा डिजिटल घोटळ्यावरून गाजली

कोकण विभागीय आयुक्तांमार्फत होणार चौकशी

Zilla Parishad Thane

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील डिजिलटल घोटाळ्याचा विषय अपेक्षितप्रमाणे शनिवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा गाजला. या विषयी चौकशीची मागणी करून तीन महिने उलटून देखिल चौकशी पुर्ण न झाल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत, प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी या संपुर्ण प्रकरणाची कोकण विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील यांनी दिल्यानंतर सभागृह शांत झाले.

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वसाधारण सभा मो.ह. विद्यालयात पार पडली. सभेला सुरुवात होताच ठाणे जिल्हा परितषदेतील शिक्षण विभागात दोन कोटी रूपये खर्चाच्या साहित्य खरेदीतील भ्रष्टाचार बाबातच्या चौकशी झाली का? असा सवाल जि.प. सदस्य संजय निमसे व सुभाष घरत यांनी उपस्थित केला. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने सदस्यांनी आक्रमक भुमिका घेतली. त्यात आधीच्या सभेत या प्रकरणाची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्यात यावी असा ठराव करण्यात आला होता. मात्र, शनिवारी पार पडलेल्या या ठरावात दुरुस्ती करून अयुक्तांना पाठविण्यात येणार असून या प्रकरणाची कोकण विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही अध्यक्ष दिपाली पाटील यांनी दिल्यानंतर सभागृह शांत झाले. यावेळी सदस्य संजय निमसे यांनी कोकण विभागीय आयुक्तांमार्फत होणार्‍या चौकशीतून न्याय मिळेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

कल्याण तालुक्यातील म्हारळगांव येथील अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकासाकडे दुर्लक्ष, तसेच इंदीरानगर दलित वस्ती रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी संबंधीत अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला सदस्या वृषाली शेवाळे यांनी लावून धरली होती. मात्र, त्यांच्या या मागणीला देखिल दोन वर्षे उलटून देखिल न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी सभागृहात व्यक्त करीत म्हारळ ग्रामपंपायतीचे नाव बदलून भ्रष्टाचार ग्रामपंचायत करा असे मत देखिल त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी त्या प्रकरणी ग्रामसेवकासह ज्यु इंजिनिअर यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिली.

दरम्यान, सध्याच्या घडीला शहापुर तालुक्यातील वैशाखरे या भागातून समृध्दी महामार्ग जात आहे. या रस्त्याचे काम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यांच्यावर काय कारवाई केली असा सवाल जि.प. सदस्यांनी विचारला, त्यावेळी त्यांच्याकडून रस्त्याची दूरूस्थि करण्यात येणार असून त्यांच्याकडून प्रति किमी 5 लाख रुपयाप्रमाणे डिपॉझिट जमा करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातील जनसुविधांच्या कामांवरून देखिल महिला सदस्य व अधिकारी यांच्यात चाळगलीच जुंपली होती. सदस्या मंजूषा जाधव यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्यावर चांगलीच टिकेची झोड उठवली होती. तसेच मागील वर्षी प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांना मंजूरी देवून देखिल त्याचे प्रमा का करण्यात आले नाही असा जाब देखिल विचारण्यात आला. याप्रकरणावरून बराच काळ सभागृहात गदारोळ सुरु होता. अखेर त्या कामांच्या मंजूरी देण्यात यावी व प्रमा करण्यात यावे असे आदेश अध्यक्ष दिपाली पाटील यांनी देताच सभागृह शांत झाले. तसेच पशु संवर्धन विभागाकडे अधिक निधी देऊन त्यांच्याकडील योजनांना बळ देण्याबाबत चर्चा होवून त्यांच्या मागणीला मंजूरी देण्यात आली. पाणी पुरवठा योजनांवर देखील सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले.