इनडोअर ते आउटडोअर : युझवेंद्र चहलचा विलक्षण प्रवास

Yuzvendra Chahal journey from Chess to Cricket.jpg

घरातल्या घरात 64 घरांच्या पटावर खेळायला सुरुवात केल्यापासून हिरव्यागार खुल्या मैदानावर क्रिकेटचा चेंडू वळवत विश्वविजेता बनण्याच्या मार्गावर चाललेला एक खेळाडू म्हणजे आपला युझवेंद्र चहल. भारताचा 28 वर्षांचा लेगब्रेक फिरकी गोलंदाज. इनडोअर ते आऊटडोअर असा त्याचा विलक्षण प्रवास आहे.

तो बुध्दिबळ खेळायचा म्हणजे काही सहज टाईमपास म्हणून नाही तर 2002 मध्ये बुध्दिबळाच्या 11 वर्षाआतील गटाचा तो राष्ट्रीय विजेता होता आणि 12 वर्षाआतील गटाच्या विश्व बुध्दिबळ स्पर्धेत भारताचा प्रतिनिधी होता. याप्रकारे भारताचे दोन वेगवेगळ्या खेळात प्रतिनिधित्व केलेल्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या निवडक खेळाडूंपैकी तो एक आहे. खरं तर असे वैशिष्ट्य राखणारा सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील तो एकमेव खेळाडू आहे.

हरियाणातील जिंदसारख्या छोट्या गावातून पुढे आलेला हा खेळाडू. 1997 ते 2003 पर्यंत तो बुध्दिबळाच्या पटावर रमला आणि त्यानंतर तो खुल्या मैदानात उतरला. क्रिकेटची बॕट आणि चेंडूशी त्याने दोस्ती केली आणि आता विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी तो इंग्लंडमध्ये आहे. 19 वर्षाआतील क्रिकेटमध्ये एकदा आपल्या संघाला जिंकून देणारी शतकी खेळी केली तेंव्हा वाटले की हा फलंदाजच होणार, पण मनगटाच्या जोरावर चेंडू वळवायचे कसबही त्याने आत्मसात केले आणि आज एक प्रभावी लेगब्रेक गोलंदाज म्हणून त्याने लौकिक कमावला आहे.

चहलची स्मरणशक्ती जबर आहे. त्याला घटना, तारखा आणि आकडेवारी चांगली लक्षात राहते. कदाचित बुध्दिबळामुळे त्याच्यात हे गूण आले असावेत.

मी बुध्दिबळ सोडून क्रिकेट खेळावे हे कदाचित नशिबातच होते. मला नेहमीच वाटायचे मी क्रिकेट खेळण्यासाठीच खेळामध्ये आलोय. अमित मिश्रा व जयंत यादव भरात असतानासुध्दा मला नेटमध्ये गोलंदाजी करायला आवडायचे. क्रिकेटशिवाय मैदानात इतर काही खैळायचाही विचार माझ्या मनाला शिवला नाही, असे तो सांगतो.

क्रिकेटपटू म्हणून मिळालेल्या प्रत्येकसंधीचा त्याने फायदा उचलला. 2014 मध्ये रॉयल चॕलेंजर्स बंगळुरूने त्याला आपल्या संघात घेतले. दिल्लीविरुध्द तो सामनावीर होता. 2015 च्या सत्रात 23 विकेट घेत तो आघाडीच्या गोलंदाजांमध्ये होता. 2016 मध्ये त्याने पुन्हा 22 बळी टिपले.

झिम्बाब्वेविरुध्द त्याला भारतीय संघात संधी मिळाली आणि दुसऱ्याच सामन्यात तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 2016 च्या सहा रणजी सामन्यांमध्ये त्याने 34 बळी मिळवले आणि इंग्लंडविरुध्दच्या टी-20 मालिकेत तो भारतीय संघात आला. बंगळूरुला त्याने 25 धावात सहा बळी अशी धमाल केली. त्यानंतर भारतीय अ संघात आणि सप्टेंबर 2017 च्या श्रीलंका दौऱ्यापासून तो भारतीय संघात कायम आहे. माजी फिरकीपटू राजिंदर गोयल, नरेंद्र हिरवाणी व प्रशिक्षक रणधीरसिंग यांचे तो मार्गदर्शन घेत असतो.

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन हे आपली प्रेरणा आहेत आणि ते आपल्यावर विश्वासही दाखवतात असे तो सांगतो. देशासाठी मी दीर्घकाळ खेळू शकतो असे त्यांना वाटते. आशिष नेहरापण मार्गदर्शन करत असतात असे तो सांगतो.

आपल्या यशात महेंद्रसिंग धोनीचाही वाटा असल्याचे त्याला वाटते. माहीच्या काळातच तो प्रथम भारतासाठी खेळला. मी गोलंदाजी करायला येतो तोपर्यंत यष्टीमागे माहीभाईंचे खेळपट्टी व फलंदाजांचे निरिक्षण झालेले असते आणि त्याचा मला खूप फायदा होतो. ते कोणत्या फलंदाजाला नेमका कुठे चेंडू टाकायचा हे सांगत असतात. त्यामुळे मला फार बरे वाटते की पहिला चेंडू टाकण्याआधीच मला खेळपट्टीची नेमकी माहिती मिळालेली असते असे त्याने धोनीबद्दल सांगितले.

कर्णधार कोहलीसुध्दा चहलवर विश्वास,दाखवतो. कौहली म्हणतो की मी त्याच्यावर भरोसा ठेवू शकतो. तो केंव्हाही गोलंदाजी करायला सांगितली तर नाही म्हणत नाही. संघात असा खेळाडू असणे फार उपयोगाचे असते असे कोहली म्हणतो.

टिल्ली वा युझी नावाने प्रसिध्द या लेगब्रेक गोलंदाजाने आतापर्यंत 40 वन डे सामन्यांत 71 बळी मिळवले आहेत आणि 29 टी-20 सामन्यात 45 बळी त्याच्या नावावर आहेत.