युवराज सिंग कोणत्या फलंदाजासाठी करणार शाहरुखखानला मेसेज?

Yuvraj Singh And Shahrukh Khan

“आयपीएल मध्ये त्याने कितीतरी वेळा कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर)ला वेगवान आणि चांगली सुरुवात दिल्याचे मी बघितलेय. मला समजत नाही की केकेआरने अशा फलंदाजाला राखून न ठेवता मोकळे का केलेय? मला वाटते की हा निर्णय चुकलाय आणि त्यासाठी शाहरुख खानला (केकेआरचा मालका) संदेश पाठवावा लागणारच आहे”, असे अष्टपैलू युवराज सिंगने म्हटलेय..पण तो हे कुणाबद्दल बोलतोय…तर ख्रिस लीन बद्दल!

ऑस्ट्रेलियाच्या या 29 वर्षीय फलंदाजाने सोमवारी रात्री अबुधाबीतील टी-10 सामन्यात फक्त 30 चेंडूतच नाबाद 91 धावा फटकावून काढल्या आणि टी-10 क्रिकेटच्या इतिहासातील पहिला शतकवीर बनण्याचा त्याचा मान अगदी थोडक्यात हुकला. ख्रिस लीनची ही खेळी बघून युवराजसिंगला राहवले गेले नाही आणि त्याने हे ट्विट केले आहे.

युवराज म्हणतो की, ख्रिस लिनची ही खेळी म्हणजे क्रिकेटचा खेळ किती पुढे गेलाय याचे उदाहरण आहे. आता टी 10 सामन्यांमध्येही फलंदाज शतकांच्या जवळ पोहचू लागले आहेत.

अबूधाबीतील या क्रिकेट लीगमध्ये पहिले शतक झळकावणारास एक फ्लॅट देण्याचे बक्षीस लीगचे प्रवर्तक शाजी उल मुल्क यांनी पहिल्याच वर्षी (2017) जाहीर केले होते. त्यावर्षी ल्युक रोंचीने 70 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर 2018 मध्ये मोहम्मद शहजादने 16 चेंडूतच नाबाद 74 धावा केल्या होत्या आणि त्याच्या राजपूत संघाने चार षटकातच 95 धावा करुन सामना जिंकला नसता तर कदाचित मोहम्मद शहजाद हाच टी-10 मधील पहिला शतकवीर ठरला असता. मात्र त्याचवेळी टी-10 मध्ये शतकी खेळीचे दिवस फार दूर नाहीत याची चाहूल लागली होती.

नंतर अलेक्स हेल्स (नाबाद 87), जॉनी बेयरस्टो (नाबाद 84) आणि रोव्हिंन पॉवेल (नाबाद 80) यांनी मोठ्या खेळी केल्या. गेल्या मार्चमध्ये विल अलेक्स याने दुबईतील आयसीसी अकॅडेमि येथे सरेसाठी लँकेशायरविरुध्द प्रत्येकी 10 षटकांच्या सामन्यातच शतक झळकावले. त्यामुळे टी-10 मध्ये शतक अशक्य नाही हे दिसुन आलेले आहे, फक्त ते पहिल्यांदा कोण झळकावतो हाच आता प्रश्न आहे.