
भारताचा स्टार क्रिकेटर युवराज सिंगला नुकताच BCCI ने एक धक्का दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या माजी भारतीय फलंदाजाला घरगुती क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली नाही. प्रत्यक्षात बोर्डाच्या नियमांनुसार, परदेशी लीग खेळलेल्या टीम इंडियाच्या कोणत्याही क्रिकेटपटूचे भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होऊ शकत नाही आणि तो खेळाडू IPL मध्येही खेळू शकत नाही. या महिन्यापासून सुरू होणार्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये युवराज सिंग (Yuvraj Singh) पंजाबच्या ३० संभाव्य खेळाडूंमध्ये होता.
पण बीसीसीआयने (BCCI) त्याला खेळू दिले नाही. त्यानंतर युवराज सिंगचे वडील योगराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योगराज सिंग म्हणाले की, ‘जर युवराजला खेळण्याची परवानगी मिळाली तर युवा खेळाडूंचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. मला यामागील नेमके कारण माहीत नाही आणि यावर मी युवीशी चर्चा करेन; परंतु हा पूर्णपणे BCCI चा निर्णय आहे. मला वाटते की, सेवानिवृत्त खेळाडूंना परत येण्यासाठी आणि तरुण खेळाडूंबरोबर खेळण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे,ज्यांच्याजवळ शिकण्यासारखं बरंच काही आहे.’
योगराज सिंग म्हणाले की, ‘मला वाटते की, हे युवीसाठी महत्त्वाचे आहे की त्याने तरुण खेळाडूंसोबत खेळत राहिले पाहिजे. IPL पूर्वी एका शिबिरावेळी त्याला तरुणासमवेत खेळण्यास सांगितले गेले होते; पण युवी म्हणाला की, आता मी खूप म्हातारा झालो आहे; पण मी त्याच्याशी खेळायला पाहिजे असा आग्रह धरला. मग त्याने चार-पाच डाव उत्कृष्ट खेळले. युवीला खेळताना पाहून तरुण खेळाडू आश्चर्यचकित झाले आणि ते असा विचार करत होते की, युवी आजही इतका चांगला कसा खेळू शकतो?’
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला