मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास… ; संभाजीराजेंचे उद्धव ठाकरेंना पत्र

sambhajiraje -UddhavTackeray

मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं (SC) स्थगिती दिली आहे. यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे . यापार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आंदोलकांना नोटीस बजावल्या जात असल्याचं सांगत राज्य सरकारने हे तात्काळ थांबवावं अशी विनंती केली आहे. आंदोलकांना पोलीस प्रशासनाने फोन करून आणि नोटीसी बजावून दबाव आणण्याचा प्रकार सुरू केला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले(Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. सोशल मीडियावर त्यांनी हे पत्र शेअर केले आहे.

प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे. आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.

संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र :

महोदय,

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर समाजामध्ये अस्वस्थतेचं वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जिल्हास्तरावर सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत. आणि आंदोलनाची दिशा ठरत आहे.

परंतु पोलीस प्रशासनाने काही आंदोलकांना नोटीस बजावणं सुरू केले आहे. नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील आंदोलकांना पोलीस प्रशासनाने वैयक्तिक फोन करून आणि नोटीसी बजावून दबाव आणण्याचा प्रकार सुरू केला आहे.

मराठा समाज हा आक्रमक म्हणून ओळखला जातो. जिथे अन्याय झाला तिथे न्यायाची बाजू घेऊन लढणारा हा समाज आहे. मग तेव्हा त्याने कधीच जात, पात, धर्म पाहिला नाही. सर्वांच्यासाठी लढण्याची भूमिका घेतली. आज हा लढा स्वतः साठीच उभारण्याची वेळ आली आहे. देशरक्षणार्थ नेहमीच सज्ज असणारा हा समाज कायद्याचे पालन करणारा आहे. मूक मोर्चा वेळी सर्व जगाने ते पाहिले आहे.

न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता,मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी. त्याउपरही जर प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपणास आमची मागणी हीच राहील की, आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी, संभाजीराजेंचे यांनी पत्रात नमूद केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER