स्थापनादिनाला युवराज गायब

Shailendra Paranjapeकॉंग्रेस पक्ष १३६ वा स्थापनादिन साजरा करत आहे. तो करत असतानाच पक्षाचे टू आय सी म्हणजेच सेकंड इन कमांड राहुल गांधी विदेश दौऱ्यावर रवाना झालेत. ते कुठे गेलेत, कशासाठी गेलेत, याची माहिती पक्षानं अधिकृतपणे दिलेली नाही. पक्ष स्थापनादिन साजरा करत असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) कुठे आहेत, हे ना कॉंग्रेसजनांना समजू शकणार आहे ना देशवासीयांना. कदाचित या गोष्टीमुळेच कॉंग्रेस आजच्या अवस्थेप्रत पोहचली असावी का? राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेसची जी अवस्था झालीय तीच महाराष्ट्रातही झालेली आहे.

महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष महाआघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असला तरीही सरकारच्या कारभारात कॉंग्रेस कुठेच दिसत नाही. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी देशावर संकट आले तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला होता, इतकी महाराष्ट्रातली कॉंग्रेस आणि महाराष्ट्रातले नेते बलशाली होते. पण आज महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस नेत्यांवर रोज उठून राज्यसभा खासदार असलेल्या शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यावर टीका करण्याची वेळ आलीय. वास्तविक मंत्रिमंडळात नसलेले पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्री असलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे दोघेही माजी मुख्यमंत्रिपद भूषवलेले नेते.

पण त्यांनाही एकूण राजकीय घडामोडींमध्ये काही विशेष स्थान आहे, असे दिसत नाही. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलेत; पण राज्यातले महाआघाडी सरकार निर्णयांच्या वेळी फिरतेय ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याभोवतीच. महाराष्ट्रात किमान सरकारमध्ये तरी असलेली कॉंग्रेस पुण्यात सत्तेबाहेर गेलेली आहे. मागच्या शतकात बहुतांश काळ पुणे महापालिकेवर कॉंग्रेसची सत्ता होती. भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना पुणे पॅटर्नचा अपवाद वगळल्यास (कॉंग्रेसला एकटे पाडण्यासाठी राष्ट्रवादी-सेना-भाजपा यांचा पुणे पॅटर्न) सत्तेबाहेरच होती. पण २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकाही जिंकून घेतली. पुण्यात कॉंग्रेसमधले माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे आमदारकीला पराभूत झालेत.

शरद रणपिसे यांनी विधानपरिषदेवर वर्णी लावून घेतलीय. उल्हास पवार, मोहन जोशी अलीकडच्या काळात फारसे सक्रिय नाहीत. त्याउलट राष्ट्रवादी कॉंग्रेसनं पुण्यात दोन आमदार निवडून आणलेत. कॉंग्रेस पक्ष हा ‘नारबाची वाडी’ या मराठी चित्रपटातल्या नारबासारखा आहे आणि तो खोतांच्या पिढ्या संपवेल पण स्वतः कधीच मरणार नाही, अशा शब्दात काही जण कॉंग्रेसचं वर्णन करतात. असाच अर्थ असलेली कॉंग्रेस ही चिवट म्हातारी आहे, अशी गोष्ट बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ नेहमी जाहीर सभांमध्येही सांगत. मात्र, तेव्हाची कॉंग्रेस आणि आताची कॉंग्रेस यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. संपूर्ण देशभर प्रभाव असलेले नेते पक्षाकडे उरलेले नाहीत. एकीकडे कॉंग्रेसचे नेते प्रादेशिक होऊ लागलेत आणि भारतीय जनता पक्षाच्या मोदी-शहा जोडीने देशव्यापी रूप धारण केलेले दिसते. काँग्रेसमध्ये पक्षसंघटनेपेक्षा व्यक्तींना महत्त्व आलेय. देशातल्या कोणत्याही पक्षाचा व्यक्तिपूजेच्या संदर्भात अपवाद नाही आणि आपला देशही व्यक्तिपूजकच आहे.

पण इतक्या विपरीत स्थितीतून पक्षाला बाहेर काढायचं तर स्थापनादिन साजरा करताना सर्वसामान्यांशी असलेली नाळ मुळात उरलेली आहे का, असेल तर ती भक्कम करण्यासाठी काय करायला हवं आणि ती तुटलेली असेल तर ती रि- एस्टॅब्लिश किंवा पुन:स्थापित कशी करता येईल, याचा विचार करायला हवा. त्यासाठी लोकशाहीत पुन्हा पुन्हा सर्वांचे मायबाप असलेल्या जनतेकडेच जायला हवे. त्याला पर्याय नाही.आता १३६ वा वर्धापनदिन साजरा करताना निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या सोनिया गांधी पक्षाच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयात ध्वजवंदन करणार आणि क्रमांक दोनचे नेते राहुल गांधी अज्ञात स्थळी निघून जाणार, हे चित्र असेल तर कॉंग्रेस पुन्हा उभी राहील कशाच्या जोरावर? असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. लोक त्यांना कंटाळले की आम्ही येऊ सत्तेवर, असं म्हणण्याचे दिवस आता गेलेत. इतर सर्व क्षेत्रातली स्पर्धात्मकता राजकारणातही आलीच आहे. परफॉर्म ऑर पेरिश हे फक्त हाताखालच्यांना किंवा क्रमांक तीनच्या पुढच्यांसाठी नाही, हे समजून घेण्याचं आत्मचिंतन आता तरी होईल, ही आशा करू या.

शैलेंद्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER