युवासेनेकडून अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण : आदित्य ठाकरे आणि कुलगरुंसमोर राडा

कल्याण : शिवसेना आणि भाजपच्या विद्यार्थी संघटना क्रमश: युवासेना आणि अभाविप यांच्यातील विरोध नवीन नाही. मात्र कल्याणमध्ये मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्याच्यावेळी दोन्ही संघटनेत मोठा राडा पाहायला मिळाला आणि तोसुद्धा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांच्या समोर आज त्यांनी गोंधळ घातला.

विद्यापीठाच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी चालतील, पण राजकीय पदाधिकारी नको, अशी भूमिका घेत अभाविपने आदित्य ठाकरेयांच्या निषेधाची भूमिका घेतली होती. सकाळी कार्यक्रमस्थळाबाहेर निदर्शने झाली, पण तरीही कार्यक्रम सुरु झाला. मात्र विरोधासाठी अभाविपने थेट कुलगुरू सुहास पेडणेकर यांचे भाषण सुरु असतानाच निषेधाच्या घोषणा दिल्या. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि युवासेनेचे कार्यकर्ते थेट अभाविप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले.

आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले मात्र तरीही कार्यकर्ते काही शांत झाले नाहीत. अखेर या सगळ्यानंतर चांगल्या कामात तरी सर्व संघटनांनी एकत्र यावे असे आव्हान ठाकरे यांना करावे लागले. दरम्यान पोलीस आम्हाला बाहेर काढत असताना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप अभाविप कार्यकर्त्यांनी केला आहे. सगळा प्रकार घडला त्यावेळी आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर, श्रीकांत शिंदे असे शिवसेनेचे नेते मंचावर उपस्थित होते.

या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी अभाविप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांसमोर अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांवरही आता कारवाई होणार का? हे पाहावं लागेल.