तुमची वेळ आता संपली, पायल घोषचा टीकाकारांना इशारा

Payal Ghosh-anurag kashyap

अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) काही दिवसांपूर्वी प्रख्यात निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap)वर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. ती केवळ आरोप करूनच थांबली नव्हती तर, वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तिने अनुराग विरोधात तक्रारही दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी अनुरागला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्याची चौकशीही केली होती. मात्र पायलच्या या आरोपामुळे बॉलिवूडमधील अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. पायलने आता ट्विट करीत, तुमची वेळ आता संपली असा इशारा टीकाकारांना दिला आहे.

पायलच्या तक्रारीनंतर रिचा चड्डा आणि हुमा कुरेशी यांनी तिच्यावर टीका करीत अनुराग कश्यपची बाजू घेतली होती. अनुरागच्या माजी पत्नीने कल्कीनेही अनुराग ची बाजू घेऊन तो तसा नसल्याचे म्हटले होते. पायलने राष्ट्रीय महिला आयोगाकडे ही याबाबत तक्रार केली होती. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांचीही भेट घेतली होती. परंतु पायल ने अनुराग कश्यप वर केलेल्या आरोपांबाबत पुढे काही झाले नाही. त्यानंतर पायल घोषने रामदास आठवले यांच्या रिपाइंमध्ये प्रवेश करीत सक्रिय राजकारणात उतरत असल्याचे दाखवून दिले होते.

आता काही दिवसांपूर्वी ट्विटर वर पायलने एक पोस्ट टाकली असून त्यात तिच्यावर टीका करणाऱ्यांना इशारा दिला आहे. पायलने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्या लोकांनी तिला चुकीचे ठरवले आणि तिच्या गप्प राहण्याला तिची हार मानले, त्या सगळ्यांची वेळ आता संपली आहे. मी पैसे जमा करीत होते. ज्यांनी मला चूक ठरवले त्यांचे आता काही खरे नाही. तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करा, पण आता तुमची वेळ संपली आहे असा इशारा तिने दिला आहे. तिच्या या ट्विटवरून बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा पायल विरुद्ध अन्य कलाकार असा सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER