तुमचं गाणं अजरामर आहे – वैभव मांगले 

vaibhav mangle

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात “गुरू रुपी ” एक खास व्यक्ती असते.अनेक आजूबाजूच्या लोकांकडून बऱ्याच गोष्टी आपण सतत शिकत असतो पण या खास गुरुच स्थान आपल्या आयुष्यात काही औरच असतं. अभिनेता वैभव मांगले यांच्या आयुष्यात देखील अशी दक खास गुरू रुपी व्यक्ती आहे. नुकतंच वैभव मांगले यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहून त्या खास व्यक्तीबद्दल च्या आठवणी जाग्या केल्या आहेत. ही खास व्यक्ती कोण आहे बघूया…

भारतीय शास्त्रीय संगीतातील गायिकां पैकी मानाचं नाव म्हणजे गानसरस्वती ” किशोरी आमोणकर ” त्यांच्या आवाजाने आपण सगळेच मंत्रमुग्ध होतो. आपल्या गोड मधूर आवाजने प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेते वैभव मांगले देखील किशोरी ताईचे मोठे चाहते आहेत. ते रोज किशोरी ताईची गाणी ऐकतात. त्यांच्या आठवणी ना उजाळा देताना वैभव मांगले म्हणतात…

” किशोरी ताई तुम्हाला जाऊन 3 वर्ष झाली … पण तुम्ही गेलात हे काही सत्य नाही.  कारण तुमचं गाणं अजरामर झालं आहे … माझा एक हि दिवस असा जात नाही कि मी तुमचं गाणं ऐकलं नाही . माझं सांगीतिक विश्व तुम्ही पूर्णपणे व्यापून टाकल आहे.आताशा तर दुसऱ्या कुणाच गाणं ऐकताना मागे तुमच गाणं चालू होत आणि सगळंच बिघडतं.तुमचं गाणं गारुड आहे , चेटूक आहे .. ज्याला याने झपाटलं तो रसिक वेडा झाला . त्याला बाकीचं काही ही रुचणार नाही.

आणि खरं सांगू का तुमचं गाणं कळायला आत झिरपायला मनाची वेगळीच मशागत असायला हवी. पराकोटीची संवेदनशीलता हवी.. मन हळवं हवं..मन हळवी असल्याशिवाय ,समृद्ध रसिकता असल्याशिवाय कलेतलं सौंदर्य टिपता येत नाही .. बाकीच्यांना फक्त शास्त्र कळतं कलाकाराची बुद्धी कळते .. त्याच्या विचार मन नाही कळतं. तुमचं गाणं कळणारे बरेच आहेत … तुमचं  गाणं कळून त्याचं चांदणं होऊन ते आतल्या आकाशात पसरून त्यात न्हावून निघणारे फार थोडे . आणि त्या चांदण्यांचं चेटूक एकदा पडलं कि पडलं . त्यातून सुटका होणं कठीण . ताई ते चांदणं आधी तुम्ही पाहिलं तुमच्या गाण्यात ते झिरपला आणि मग आमच्या रसिकतेची आभाळ भरून गेली.

तुमचा यमन गाऊन संपतो पण त्याची आस कायम राहते . अनेक दिवस यमन मागे मागे चालत राहतो हा जाणते अजाणते पण …नि ,रे ,म / नि रे ग / नि रे सा … हे येतच राहतात मागे मागे … ग म प ध प …ध म प …. नि रे प म प …. हे असे साप विळखा घालून बसतात दिवसेंदिवस. ताई तुम्ही थोर आहात .

आतातर ज्याच्या कले पुढे मान खाली झुकावी अशी माणसं एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकीही शिल्लक नाहियेयत.तुम्ही एकमेवातद्वीतीय आहात.

तुमच्या मनात ,विचारात सौंदर्य होतं म्हणून तुमचा सूर सुंदर झाला.. गाणं वॅन गॉग च्या रंगानं सारखं रंगीत ,सजीव झालं … आणि मी हि सुंदर झालो. तुमचं गाणं आत रुतायला आत्मा सुंदरच असावा लागतो. “

अभिनेते वैभव मांगले स्वतःह खूप उत्तम गातात आणि त्यांना गाण्याची अनोखी आवड आहे. अभिनयाच्या सोबतीने ते एक उत्तम गायक देखील आहेत. अभिनय आणि गायनाची अनोखी आवड संपादन करून ते अनेकदा गाणी गात असतात. नाटक , मालिका , चित्रपट अश्या विविध क्षेत्रात काम करून त्यांनी आजवर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी चित्र काढून ती विकण्याचा अनोखा संकल्प केला आहे आणि या चित्रा मधून येणारी रक्कम ते नाटक क्षेत्रातील लोकांना मदत म्हणून देणार आहे. नट म्हणून ते उत्तम आहेत पण माणूस म्हणून सामाजिक जाण असलेला हा अनोखा कलाकार देखील आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER