“आपुलाचि वाद आपणासी “

Your argument with you

हाय फ्रेंड्स ! दररोज जीवन जगताना मी कोण ? माझ्या जीवनाचा उद्देश काय ? असेही प्रश्न पडत असतात. आयुष्याची वाटचाल करताना आपण एकीकडे लोकांशी जुळवून घेत असतो तर एकीकडे मी कोण ? मी नेमका कसा आहे ? मला काय करायचं आहे ? माझ्या एकूणच अस्तित्वाचा शोध घेणे सुरू असतं. म्हणजे एकीकडे इतरांशी चाललेला संघर्ष आणि दुसऱ्या बाजूने स्वतःचा स्वतःशी चाललेल्या संघर्ष म्हणजे “आपुलाची वाद आपणासी “अशी स्थिती असते. हे दोन्ही संघर्ष जेवढे कमी तेवढी मानसिक शांती लाभते. का होतो हा वाद ? का होतो हा संघर्ष ?

आपण मागील काही लेखांमध्ये बघतो आहोत, त्याप्रमाणेच काही मानवाच्या गरजा याला कारण असतात. एक गरज म्हणजे” नीड फॉर पर्पज अँड मिनिंग ऑफ लाइफ”. म्हणजे मी या पृथ्वीवर का आलो/आले ? माझ्या अस्तित्वाचा अर्थ आणि उद्दिष्ट काय? याचे विश्लेषण करण्याचा अनेक मानस शास्त्रज्ञांनी आपापल्या सिद्धातातून प्रयत्न केला. त्यासाठी अस्तित्ववादी आणि मानवतावादी विचारसरणीच्या लोकांनी संकल्पना मांडल्या.

पूर्वी फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञांने मांडलेला मनोविश्लेषणात्मक सिद्धांत, आणि वॉट् सन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला वर्तनवादी सिद्धांत प्रचलित होता. यामध्ये अनुक्रमे माणसाच्या अबोध मनाचा आणि वर्तनाचा केवळ विचार केला होता. परंतु दुसऱ्या महायुद्धा नंतर भयानक हाल व अनन्वित अत्याचार सहन केलेल्या व्यक्ती जेव्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभ्या राहिल्या त्याने प्रभावित होत अस्तित्ववाद उदयाला आला. याला तात्वीक आणि आध्यात्मिक विचारांची बैठक होती.

यानुसार प्रत्येक व्यक्तीच स्वतःच्या जीवनाला उत्तरदायी असते आणि आपलं आयुष्य अर्थपूर्ण करणं ही त्या व्यक्तीची जबाबदारी असते. व्यक्तीचे स्वतःचे अनुभव हेच खऱ्या माहितीचे स्त्रोत असतात. त्यामुळे मुळात समस्या कुठे आहे ते समजू शकत. आपलं साध्य काय ? आपल्याला कशी व्यक्ती व्हायचं आहे ?आपली जीवन मूल्य कोणती ? याचा शोध घेणे हे कठीण काम आहे, पण आपली कार्य साकारताना सामाजिक कल्याण व भान ठेवूनच जीवन क्रम आखावा. मृत्यूच्या भयाने हतबल न होता जीवनात सांगण्यासारखे एक तरी अर्थपूर्ण कार्य करायला पाहिजे. असं हा सिद्धांत सांगतो.

हे काम सोपं नव्हतं. पण यातूनच पुढे मानवतावाद जन्माला आला. त्यातून लक्षात आलं की प्रत्येक व्यक्तीत अनेक क्षमता ,योग्यता मुळात असतातच .या सुप्त क्षमतांच्या विकास प्रक्रियेतून दुसऱ्यावर निस्वार्थी प्रेम करणे, आणि इतरांचे प्रेम ,मानसन्मान ,प्रतिष्ठा प्राप्त करणे. आणि त्यातूनच शेवटी जीवनातील सर्वोत्तम ध्येय साकार करून ,वैश्विक शक्तीचा अंश बनून विश्वात सामावून जाणे शक्य होते. थोडक्यात मानवाच्या स्व संकल्पनेला ,आदराला, प्रतिष्ठेला, महत्त्वाचे स्थान दिलेले आहे.

आणि अशा जीवनाचा अर्थ कळलेल्या व्यक्ती मोठी कार्य उभी करू शकतात हे आपण आजूबाजूला बघत असतो. विविध मोठमोठे प्रकल्प वेगवेगळ्या ,विविध NGO तून काम करणाऱ्या व्यक्ती.बरेचदा यांच्या अस्तित्वाची ओळख यांच्या प्रकल्पातून होते .

मानवाला स्वतःची असलेली योग्यता, क्षमता समजण्यासाठी महत्त्वाची असणारी म्हणजे “स्व” ची संकल्पना. (Self Awareness , Self Respect , Self Esteem )आणि तीच मानवाची आणखीन एक गरज आहे. मला मिळणारे स्टेटस, समाजात मला हवा असणारा आदर,सन्मान प्रतिष्ठा ! ही गरज पूर्ण झाली तर सुप्त क्षमता यांचा योग्य वापर शक्य होतो, आणि जीवनाचा अर्थ लवकर कळतो, हेतू कळतो. प्रसिद्ध विचारवंत सॉक्रेटिस म्हणतो की, “स्वतःला जाणून घ्या.”स्व संकल्पनेसाठी आपले आयुष्यातले अनुभव, स्वतः बद्दलचे निरीक्षण, आणि परिसराशी होणारा संवाद जबाबदार असतो.

उदाहरणार्थ आपण आपले कपडे खरेदी करण्यासाठी दुकानात जातो. खूप वेगवेगळ्या स्टाईल्स चे ड्रेस आपल्याला आवडतात. पण ते नेमके एस किंवा एम सायझेस मध्येच उपलब्ध असतात. आपण खूप शोधून पुढचा साईझ XL शोधून काढतो आणि घालून बघतो. आरश्यात बघतो ,रंग खुलत असतो , छान दिसतो .पण तो फारसा जमत नाही. शेवटी XXL घेऊन घरी येतो. येताना पाणीपुरी खातो. पण ती तेवढी चटपटीत लागत नाही. कारण आपलं मनच त्यावेळी आपल्याला खात असतं. सांगत असतं “आता तरी व्यायाम कर”. ती आरशातली प्रतिमा आणि माझी मला कळलेली ‘आत्ताची माझी प्रतिमा ‘यात खूप अंतर असतं.

हीच ती स्व संकल्पना . म्हणजे स्वतः बद्दल स्वतः निर्माण केलेली प्रतिमा. उदा. एखाद्या निर्णायक परीक्षेला जाताना आपल्याला हृदयाच्या धडधडीची जाणीव होते.

यापेक्षा स्वप्रतिमा वेगळी.आपण आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो त्याला म्हणतात स्वप्रतिमा. हा दृष्टिकोन आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार येण्याच्या काळातच लोक आपल्याशी कसे वागतात? आई बाबा कसे बघतात? आपण तरुण व प्रभावी होतो तेव्हा लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील? त्यांनी आपले केलेले मूल्यमापन व अपेक्षांचा आपण मनातल्या मनात विचार करतो ,त्यावर आपली स्वप्रतिमा ठरते.

मात्र स्व प्रतिमेत सुधारणा करू शकतो. एका मुलीचे आई वडील तिचा खुप राग द्वेष करत असत. पण जेव्हा ती तरूण झाली त्यावेळी तिने स्वतःबद्दलचा दृष्टिकोन बदलून टाकला. ती चांगल्या ग्रुपमध्ये सहभागी झाली. स्वतःसाठी बरच काही करताना ती स्वतःला आवडू लागली. थोडक्यात व्यक्तिगत अनुभवातून व्यक्ती आपली स्वप्रतिमा बदलू शकते.

यातून पुढे निर्माण होतो तो, स्वआदर भाव. आपल्या स्वतः बद्दलचे वैयक्तिक मूल्यमापन ! यावर आदर्श स्व आणि बालपणीच्या अनुभवांचा परिणाम होत असतो. परंतु उच्च स्व आदर धारण करणारे लोक त्यांच्या स्वतःबद्दलच्या मता बाबतीत योग्य-अयोग्य, सत्य असत्यता व्यवस्थित तपासून पाहत असतात. उच्च स्व आदर असणारे लोक, आत्मविश्वास असणारे व आनंदी असतात. आपल्या शक्तीची व कमकुवतपणाची सुद्धा योग्य ती जाणीव त्यांना असते.

बालपणातील अनुभवातून, इतरांनी केलेल्या टीकाटिपणीतून, स्वीकारातूनच स्व ची घडण होत असते.कोणत्याही गोष्टीसाठी मुलांची किंवा स्वतःची देखील दुसऱ्याशी तुलना करू नये .आपले गुण व दोष योग्य स्वीकारले तर आपला स्व आदर कायमस्वरूपी बळकट राहणार असतो. प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट ! अशी परिस्थिती होण्यासाठी बालपणीच्या जडणघडणीचा वाटा असतो. म्हणूनच छोट्या-छोट्या चुकांसाठी रागवणे ,सारख्या सूचना देणे यामुळे स्वतःचा पुरेसा विकास होत नाही. आणि अशा व्यक्ती न्यूनगंडाची शिकार बनतात . दुर्मुखलेल्या आणि निराश होतात. जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही .निष्कारण स्वतःला कमी लेखतात. जी व्यक्ती स्वतःला स्वीकारते ,स्वतःवर प्रेम करते, तीच इतरांना प्रेम ,आदर ,आणि सन्मान देऊ शकते. स्वचा शोध लागल्यानेच ती आयुष्याचा अर्थ गवसून समाजाचे देणे पण देऊ शकते.. या परति काय हवे ? पण त्यासाठी,”मन गुरू, मन शिष्य l करी आपुलेची दास्य l प्रसन्न आपणास l गती अथवा अधोगती l l

आपण आपल्या मनाचे स्वतः गुरु होऊन स्वतः विषयीचा आदर, सन्मान, प्रतिष्ठा जोपासून अस्तित्वाचा अर्थ शोधूया कारण ती गरज आहे, तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची !

ह्या बातम्या पण वाचा :

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER