पावनखिंडीत मद्यपींना शिवप्रेंमीकडून चोप

Shivrashtra's party workers beat drunker

कोल्हापूर :- पावनखिंडीमध्ये दारू पीत बसलेल्या वीस ते पंचवीस मद्यपींची शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी धुलाई केली. शिवराष्ट्रचे कार्यकर्ते पावनखिंड मोहिमेहून परतत असताना काही तरुण येथील पावनखिंड पार्किंग परिसरात पाच ते सहा गाड्यांमध्ये दारू पित बसले होते. याची माहिती मिळताच शिवराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी या सर्वांना बेदम चोप दिला. मद्यपी तरुण करवीर तालुक्यातील रहिवासी आहेत.

जून ते नोव्हेंबरअखेर पन्हाळा-पावनखिंड मोहीमेचे अनेक संघटनासह शिवप्रेमीकडून आयोजन केले जाते. कोल्हापुरात पावनखिंड मोहीम ही परंपरा बनत आहे. मात्र, या मोहीमेच्या मार्गावर ओल्या पार्ट्या करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. परिसरातील तरुण पावसाळी सहलीच्या निमत्ताने या मार्गावर धिंगाणा घालत असल्याचे प्रकार यापूर्वीही घडले होते. मात्र, बुधवारी शिवराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी पावनखिंडीत मद्यप्राशन करणाऱ्यांना चांगलाच हिसका दाखविला.

शिवराष्ट्र संस्थेची १३ ते १५ जुलै दरम्यान पन्हाळगड पावनखिंड मोहीम होती. १५ जुलैला पावनखिंडमध्ये मोहिमेचा समारोप झाला. समारोप झाल्यानंतर कार्यकर्ते पांढरे पाण्याची दिशेने जात होते. यावेळी पावनखिंड पार्किंग परिसरात पाच ते सहा गाड्यांमध्ये करवीर तालुक्यातील २० ते २५ तरुण दारू पीत बसल्याचे दिसले. शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाड्यांची झडती घेतली. दारू पीत बसलेल्या तरुणांना गाड्यांमधून बाहेर काढून लाथा बुक्क्यांनी चांगलाच चोप दिला. यापुढे अशाप्रकारे पावनखिंड तसेच कोणत्याही किल्ल्यांवर दारू पिणार नसल्याची कबुली या मद्यापींनी दिली. शिवाय अशाप्रकारावर प्रतिबंध बसावा, यासाठी पावनखिंड परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.