‘तुम्ही बसा घरी, मराठी माणूस आमची जबाबदारी !’ मनसेची नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर टीका

CM Uddhav Thackeray-Raj Thackeray

मुंबई :  कुलाब्यात मराठीवरून झालेल्या वादात मनसेने त्या व्यापा-यास  चोप दिल्यानंतर शिवसेनेनेही (Shivsena) या वादात उडी घेतली होती. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केल्याचे दिसून येत आहे. ‘तुम्ही बसा घरी, मराठी माणूस आमची जबाबदारी’ असे ट्विट संदीप देशपांडेंनी केले  आहे. या ट्विटच्या कॅप्शनसह संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंचा (Raj Thackeray) फोटो ट्विट करत तेथे ‘माझी मराठी माझी जबाबदारी’ असे लिहिले आहे.

गुरुवारी कुलाब्यात मराठीवरून चांगलाच वाद पेटला. गुजराती असलेल्या महावीर ज्वेलर्सच्या मालकाने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मराठमोळ्या लेखिका शोभा देशपांडे (Shobha Deshpande) यांनी दुकानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध शोभा देशपांडेंनी रात्रभर ठिय्या मांडल्यानंतर सकाळी आंदोलनस्थळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे पोहचले व त्या दुकानदाराला चोपले. त्यानंतर या दुकानदाराने मराठीत त्यांची माफी मागितली.

नंतर या प्रकरणात शिवसेनेनेही उडी घेतली व ‘महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीचा मान-सन्मान राहिला पाहिजे. कुणी मराठीचा अपमान करत असेल तर शिवसेना पीडितांच्या बाजूने उभी राहील.’ अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इशारा दिला. त्यानंतर आता मनसेचे नेते, सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शरद पवारांचा कार्यक्रम लांबणीवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER