तू प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो; राज ठाकरे यांचा रूपाली पाटील यांना निरोप

raj Thackeray & Rupali patil.jpg

पुणे :- पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रूपाली पाटील (Rupali Patil) यांना खुनाची धमकी देण्यात आली आहे. सातारा येथून अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचा आरोप आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रूपाली पाटील यांना फोन करून धीर दिला – ‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो.’ (MNS Raj Thackeray Call Rupali Patil) रूपाली पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात उतरल्या आहेत.

मनसेकडून त्या निवडणूक लढवत आहेत. त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर (Kolhapur) अशा भागांत त्या प्रचार करत आहेत. दरम्यान, पाटील यांना फोन करून एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. रूपाली पाटील यांना धमकी मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी पाटील यांना फोन करून त्यांची विचारपूस केली. आतापर्यंतच्या निवडणूक प्रचाराची माहिती घेतली आणि ठाकरी शैलीत धीर दिला– ‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो.’ राज ठाकरे यांच्या फोननंतर रूपाली पाटील म्हणाल्या – ज्यांना राज ठाकरे यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही.

अशा धमक्यांना मनसेवाले भीक घालत नाही. धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात रूपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. तसंच धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, धमकीला मी घाबरणारी नाही. विद्यार्थी, शिक्षकांच्या अधिकार आणि हक्कांसाठी मी लढत राहीन, अशी प्रतिक्रिया रूपाली पाटील यांनी धमकीनंतर व्यक्त केली आहे.

कोण आहेत रूपाली पाटील?

पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून रूपाली पाटील यांनी काम पाहिले आहे. सध्या त्या मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचं विशेष काम आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवासदेखील भोगला आहे. त्या उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण बी.कॉम. एलएलबी  झाले आहे. त्या व्हॉलीबॉल आणि शूटिंग व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत.

पुण्यातील मनसेचा आक्रमक आवाज

पुणे शहरातील मनसेचा आक्रमक आवाज म्हणून रूपाली पाटील यांची ओळख आहे. पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची बाजू घेऊन त्या सातत्याने भांडत असतात. कोविड काळातदेखील अनेक रुग्णालयांना भेटी देऊन तेथील गैरप्रकार त्यांनी उघडे पाडले होते. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्या सातत्याने भूमिका घेत असतात.

ही बातमी पण वाचा : ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, सरकारला ‘शॉक’ देण्यासाठी मनसेची जय्यत तयारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER