“तुम्ही फक्त लढ म्हणा !”

तुम्ही फक्त लढ म्हणा

हाय फ्रेंड्स ! कालच्या लेखात आपण मनाच्या पोषणासाठी आवश्यक असणार्‍या व्यक्तीच्या गरजांचा आढावा घेतला आणि त्यासाठी मॅस्लो या मानसशास्त्रज्ञांच्या उतरंडीचा वापर केला. प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनाचा आणि शरीराचा आवाज ऐकून शरीर आणि मन यांच्यात संबंध ठेवणे किती गरजेचे आहे आणि त्यासाठी काय करूया याचा विचार केला.

आज आपण” नीड टू फिल सिक्युअर अँड सेफ” आणि ” नीड टू गिव्ह अँड रिसिव्ह !”या दोन गरजांचा विचार करू. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि उबदार , काळजी घेणारे वातावरण हव असतं आणि प्रत्येकचं व्यक्तीला हातचं न राखता केलेली कौतुकाची देवाण-घेवाण हवीहवीशी वाटते. या दोन्हीचा आयुष्यावर खूप सकारात्मक परिणाम होत असतो.

आपण मागे एका लेखामध्ये (माझ्या सुखाचा परीघ) कम्फर्ट झोनचा विचार केला होता. त्यावरूनच मानवाला सुरक्षिततेची आणि उबदार पणाची गरज किती असते हे लक्षात आलं. बरेचदा कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं नाही म्हणून तो प्रगतीचे मार्ग सुद्धा बंद करतो. आईच्या उदरातून बाहेर आलेल्या बाळाचा टाsहा ! हा सुरक्षितता हरवल्यामुळे आणि स्वतंत्र श्वासोच्छ्वासाची जबाबदारी पडल्यामुळे असेल का?पुढेही आईजवळ नसली की बाळाची नजर तिलाच शोधत असते.

ही सुरक्षिततेची गरज केवळ आजची नाही .तर अनेक वर्षांपूर्वी वानराचे मानवात रूपांतर होतांना जेव्हा आदी मानवाची निर्मिती झाली, त्याही काळात त्या मानवापुढे, अस्तित्वाला मारक ठरणारी म्हणजेच जीवशास्त्रीय आव्हान होती. त्यांना रानटी पशु, नैसर्गिक आपत्ती आणि टोळ्यांमधील युद्ध इत्यादींना तोंड द्यावे लागे आणि त्यानुसार त्वरित निर्णय घेऊन तो तात्काळ अमलात आणावे लागे. केवळ फाईट, फ्लाईट, फ्रिज या तीन पर्यायांपैकी अनुरूप पर्याय शोधण्यासाठी सदैव दक्ष राहावे लागे.

पण अलीकडची संकट ही अस्तित्वाचा प्रश्न असणारी नाहीत. औद्योगिक आणि डिजिटल क्रांतीमुळे प्रश्न मनोसामाजिक आहेत. त्यामुळे पूर्ण विचारांती निर्णय घेऊन आपण रिस्पॉन्स देऊ शकतो. पण आपली इस्टंट उपायांची सवय गेलेली नाही आणि म्हणून आपण प्रतिक्रियाचं देतो .त्यामुळे संघर्षात वाढच होते. घरातील वातावरणाचा प्रत्येक वयातील मुलांवर परिणाम होत असतो .घरातील संघर्षाने मुले गांगरतात, त्यांना असुरक्षितता वाटते. मध्यंतरी कोरोना च्या पिरेड मध्ये पालकांच्या नोकरीवर आलेली संकटे ,ताण तणाव, एखाद्या फॅमिली मेंबर वर कोरोनाचा परिणाम, हे सगळं प्रकरण एक प्रकारे सगळ्यांवर चिंता ,टेंशन, भीती वाढवणार होतं .घर, कुटुंब हे मुलांनाच नव्हे तर प्रत्येकालाच उबदार आश्वासक हवं असतं.

अजूनही कॉलेजेस, शाळा सुरू झालेल्या नाही .फायनल इअरचे रिझल्ट लागायचे आहे .आता कुठे इ एत्रन्स एक्झाम पूर्ण होत आहे. सगळी क्षेत्र ठप्प झाल्यासारखी आहेत. तरुण वयातील मुलं 18 ते 25 वर्ष या दरम्यान ची सगळ्यांना करिअरची चिंता आणि अनिश्चितता भेडसावते आहे. अजून बरेचसे व्यवहार ,व्यवसाय पूर्णांशाने सुरू झालेले नाही . कोरोनाची दुसरी लाट येऊन फ्रान्समध्ये लॉक डाऊन परत लागू झाल्याच्या बातम्या येत आहेत .थोडक्‍यात भविष्याच्या अनिश्चिततेने सगळ्यांना असुरक्षितता भेडसावते.

त्याच प्रमाणे सर्वत्र होणारे हिंसाचार आणि लैंगिक अत्याचार हे ही समाजातील असुरक्षिततेचे निदर्शक आहे. उदाहरणार्थ जेव्हा दहावीचा रिझल्ट लागल्यावर एखादी आई मुलीला बिल्डिंग मध्ये पेढे वाटायला पाठवते, त्यावेळी ती एका आजोबांकडे जायला नकार देते .आई चिडते, पाठवायचा प्रयत्न करते. कारण असं बरं दिसत नाही, सगळ्यांना दिले आणि त्यांच्याकडे का नाही? असं तिला वाटतं. पण त्या मुलीचा त्यांच्याबद्दलचा अनुभव चांगला नसतो .एकदा आजी बाहेर गेल्यावर त्यांनी चॉकलेट साठी बोलून तिला शाबासकी देण्यासाठी पाठीवरुन हात फिरवलेले असतात की जो स्पर्श तिला अजिबात आवडलेला नसतो. एखादा सात आठ वर्षाचा मुलगा ग्राऊंडवर खेळायला जायला अचानक नाकारायला लागतो तेव्हा न रागवता त्याला शांततेने बोलल्यावर कदाचित आपल्याला त्याचं कारण कळतं. बरेचदा मुलांना काही अनुभव आलेले असतात. एवढ्या कोवळ्या वयापासून वाटणारी ही असुरक्षितता आज वाढली आहे हे आमचं केव्हढ दुर्दैव !

माणसाचं वय झालं की आरोग्याची आणि एकटेपणाची असुरक्षितता त्याला जाणवते. एकूणच व्यक्तीच्या वयाच्या विविध टप्प्यांवर, सुरक्षितता या गरजेचे स्वरूप आणि व्याप्ती बदलत जाते, मात्र गरज संपली असं होत नाही.

कुठल्याही व्यक्तीची आणखीन एक महत्त्वाची गरज म्हणजे मन मोकळेपणी, हातचा न राहता, परस्परांना दिलेली दाद किंवा प्रशंसा ! कौतुकाची थाप देणे आणि घेणे यामागे प्रेरणा असते. आपण एखादे काम मनापासुन करतो, ते कुणी आपल्याला सांगितलेलं नसतं ! पण ते केल्याने आपल्याला एक आत्मिक आनंद मिळत असतो .उदाहरणार्थ पाहुण्यांची सरबराई करणे ,अगत्य. नातेवाइकांच्या आजारपणात मदत करणे, हाताखाली काम करणाऱ्या किंवा सहकाऱ्याला जर काही पैशाची, मनुष्यबळाची मदत हवी असेल तर ते पुरवणे. हे केल्यानंतर एक समाधान मिळतं असते ती असते अंत:प्रेरणा ! त्यात असते उस्फूर्तता !

पण कुठल्याही व्यक्तीला दाद ही हवीच असते ! अशी दाद जशी मिळत जाते ,तशी एखादी मैफल अजून अजून रंगत जाते. एखाद्या निरपेक्ष कामाला अवॉर्ड मिळाले , पुढचे काम दुप्पट वेगाने होते. दिवसभर श्रम व मोठ्या कष्टाने एखादा किचकट पदार्थ केला नी खाणार्‍यांनी मनसोक्त खाल्ला. पुन्हा मनमोकळं कौतुक करत खाल्ला, तर गृहिणी आग्रह तर करून वाढतेच आणि वर डब्यात घालून देते असही म्हणते. कारण काय ?तर मनमोकळी दाद! तिच्या दिवसभराच्या श्रमांचा परिहार करते.

पालकांनी केलेल्या छोट्याशा गोष्टीचे कौतुक किंवा नववधूने सासरी आल्यावर केलेली साधी आमटी सगळ्यांनी कौतुक करत खाली तर तिचा आत्मविश्वास ,,उत्साह ,जवळीक व स्वीकारल्याची भावना वाढीस लागते. नवीन जॉईन झालेला कर्मचारी त्याचं केलेलं कौतुक हे सांभाळून घेणार असतं,, तर चांगल्या हस्ताक्षराची व नीटनेटकी म्हणून वर्गात आपली दाखवलेली वही ही अभिमानाची आठवण जन्मभर राहते.

पण ……! सगळं करून वर “आई घरी काय करते ? किंवा घरीच तर असते. दिवसभर झोपा काढत असशील” याने तिचे अवसान गळते, मन प्रचंड नाराज होते. आयुष्यभर कष्ट करून जिथे कौतुकाचे दोन शब्दही मिळत नाहीत, त्या घरासाठी, त्या संस्थेसाठी काहीही न करण्याची इच्छा स्वाभाविक आहे. कारण अन्न वस्त्र निवारा या इतकीच महत्वाची ही गोष्ट आहे .

पण मग अडचण येते कुठे ? तर व्यक्तीच्या मनाचा कोतेपणा !तुलना ,इर्षा ,मत्सर या गोष्टी मनाचा मोकळेपणा बाळगूच देत नाही. मात्र हे बूमरँग असतं .तुम्ही प्रेम दिलं, कौतुक केलं ,दाद दिलीत तर तुमच्या हि वाट्याला हे सगळं मिळतं. पण कायम आड्यतेने , कोतेपणाने मागून मनःशांती मिळू शकत नाही .हेच कौतुकाचे दोन शब्द मनाला आकाशात उंच भरारी मारणाऱ्या पक्षाच्या पंखातील बळ देतात. कौतुकाची हीच देवाण-घेवाण दुराव्याची दरी दूर करुन साकव बनते.

कुसुमाग्रजांच्या छंदोमयी काव्यसंग्रहातील’ कणा ‘या कवितेत म्हटल्याप्रमाणे त्यांचा एक विद्यार्थी म्हणतो ,की गंगामाई जणू माझ्या घरात पुराचे पाणी घेऊन घुसली आणि माहेरवाशिणीसारखी सर्वत्र नाचली. जाताना प्रसाद म्हणुन फक्त डोळ्यातलं पाणी ठेवून गेली. आता घर मोडलय ,संसार उद्ध्वस्त झाला आहे. फक्त बायको तेवढी वाचली आहे. आता मी पूर्ण प्रयत्न करून पुन्हा घर उभारणार आहे ! पण सर तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा !

दुःखाच्या खाईत किंवा संकटात पाठीवरची कौतुकाची किंवा प्रेम, माया,कौतुकाची थाप केवढी महत्वाची याचं हे सुंदर उदाहरण ! तेव्हा फ्रेंड्स ! एकमेकांचे कौतुक, एकमेकांना दाद ,कुठलाही कोतेपणा न ठेवता देऊया ! कारण की ती गरज आहे तुमची ,माझी ,प्रत्येकाची !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

ही बातमी पण वाचा : अंतरीची साद माझी..!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER