तू बुध्दी दे… तू तेज दे नवचेतना…. विश्वास दे !

Dipotsav-Govardhan Pooja

हाय फ्रेंड्स ! आजपासून दीपोत्सवाला सुरुवात झालीय. आज गोवत्स द्वादशी. गाय गोरह्याची पूजा आपल्याकडे करतात. आपल्या संस्कृतीतून प्रत्येक सणाच्या निमित्ताने निसर्गातील सर्वगोष्टीप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. गाय ‘गोमाता ‘तिचं महत्त्व आपल्याकडे फार पूर्वीपासूनच आहे आणि अलीकडे पाश्चात्य देशातही महत्त्व आलेल आहे. याविषयी आपण वाचत आणि बघत आहोतच. निसर्गातील प्रत्येक गोष्ट मानवाला काहीतरी देत असते. एवढेच काय निसर्ग हा खरोखरच माणसाचा गुरु आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

दिवाळीत अनेक दीप लावून आपण अंधारावर मात करत असतो. सभोवताली उजळून टाकतो.पण आपल्या मनावर असलेली काजळी पण साफ करूया का जरा? अंतरीचे दिप उजळून आपल्या जीवनात परत आनंदी होऊ शकतो .ते पण या दिवाळीत अपेक्षित आहेच! तेव्हा चला तर मग नकारात्मकतेची काजळी जरा झटकू या !

फ्रेंड्स ! आपण सकारात्मकता हा शब्द वारंवार ऐकत असतो. वापरतही असतो. खूप बोलतो ही यावर. प्रत्येकाने सकारात्मक विचार करावा, वृत्ती सकारात्मक ठेवावी, परिस्थितीला सकारात्मकतेने सामोरे जावे आणि असं बरंच काही!

पण प्रत्यक्षात मात्र” ये सब मेरे साथही क्यो?”असं म्हणत कपाळाला हात लावून बसणं कितीतरी वेळा होत असतं प्रत्येकाचं. जगात जे काही चांगलं वाटतंय ते सारे इतरांच्या आयुष्यात, माझ्या वाट्याला ना नेहमी वाईटच येत ! सेल लागला म्हणून मला कळतं पण उशिरा. म्हणजे मी नेमकी जाते तेव्हा सगळाच चांगला स्टॉक संपलेला असतो. पिक्चर ला जावे तर हाउसफुल ची पाटी दिसते.

असा नन्नाचा पाढा वाचणाऱ्या व्यक्तींची तब्येत कधीच छान नसते. नोकरीवर सतत अन्याय होत असतो. समाजात मानाचे स्थान नसतं मिळत, आणि घरीही अपेक्षित प्रेम सन्मान आदर नाही मिळत. काम मिळालं तरी चिडचिड! नाही मिळालं तरी चिडचिड. चेहरा कायमच दुर्मुखलेला. या लोकांचं स्वतःवर देखील प्रेम नसतं आणि काही बदलावे अशी इच्छाही नसते. त्यामुळे हे लोक त्याचं त्याचं ठिकाणी साचलेल्या पाण्यासारखे राहतात. पाणी शेवाळ जमले म्हणून रडत राहतात.

एक छोटीशी गोष्ट आहे. एका छोट्या गावाच्या वेशीवर एका आजीबाईंची झोपडी असते. घरातलं काम आटपून ऊन्ह खायला आजीबाई नेहमी दारात येऊन बसते. असेच एक दिवस एक वाटसरू त्या रस्त्याने जात असताना तिच्याजवळ थांबतो आणि विचारतो ,की “या गावातले लोक कसे आहे ? मी या गावात नवीनच येतोय राहायला.” त्यावर ती विचारते, “तू अगोदर होतास त्या गावातील लोक असे होते? “ती व्यक्ती म्हणते ,”काय सांगू आजी! ते खूप दुष्ट कंजूष आणि भांडकुदळ होते”. त्यावर म्हातारी पटकन म्हणते,” हो ना !मग या ही गावातील लोक तसेच आहेत. एक नंबरचे भांडकुदळ.”

काही दिवसांनी पुन्हा दुसरा एक प्रवास येतो, तोही हाच प्रश्न म्हातारीला विचारतो. आजी या गावातले लोक कसे आहेत. म्हातारी त्यालाही विचारते ,”तू आधी राहत होतास तेथील लोक कसे होते बरं?” त्यावर तो सांगतो,” काय सांगू आजी !अतिशय सज्जन धार्मिक आणि जीव लावणारे लोक हो माझ्या गावचे ! खरे तर गाव सोडताना त्यांना आणि मला दोघांनाही खूप वाईट वाटलं. पण नोकरी धंद्यापुढे काय.!” तेव्हा म्हातारी ने सांगितले, “या गावातले लोक तसे चांगले आहेत. काळजी करू नका”.

सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीला सगळे जग सकारात्मकच दिसत. पण पण दृष्टिकोनच नकारात्मक असेल तर सगळच नकारात्मक दिसणार असतं.

सकारात्मक व्यक्ती असतात, त्यांच्या साठी विश्वास ही भावना महत्त्वाची असते तर नकारात्मक व्यक्तीं मात्र भीती या भावनेच्या आधीन असतात.आपल्या दिवसभराच्या दिनाक्रमानुसार येतील त्या घटना व आपल्या प्रतिक्रियांचा आढावा घेतला, तर आपल्यावर भीतीचा किती व विश्वासाचा पगडा किती हे लक्षात येतं.पण सगळं ऐकण,माहिती असणं असं सगळं असूनही आपल्याला बरेचदा” कळतं पण वळत नाही “अशी स्थिती का येते? याला उत्तर माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन आणि ज्ञान म्हणजे नॉलेज या मध्ये असणारा फरक. No one can ‘ apply ‘ information unless it is transformed into a knowledge ! जोपर्यंत आपल्याला असणारी माहिती आपण पडताळून बघत नाही तोपर्यंत त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर होत नाही.कुठलाही एक आजार झालाय एवढं माहिती असून भागत नाही तर त्यासाठी आवश्यक ती पथ्ये पाळावी लागतात. जे कृष्णमूर्ती म्हणतात,” जे सत्य तुम्हाला समजले आहे ते तात्काळ जगा !”

निसर्गातील प्रत्येक गोष्ट निसर्गतः सकारात्मक आहे असे दिसते. झाड कितीही तोडले तरी थोडाही प्राण असेल तर त्याला पागोरे फुटतातच. पावसाने घर वाहून गेले म्हणून मुंग्या कधी रडत नाही, किंवा माझ्यापेक्षा तिच्या वारुळात जास्त धान्य कसं ? असं कधी मुंग्या म्हणत नाही .उलट एकमेकींना रस्ता दाखवत धान्य पर्यंत पोहोचतात. पिल्लांच्या पंखात बळ आले की ती उडून जातात मुख्य म्हणजे परत कधीही न येण्यासाठी! पण कुठलीही चिमणी empty nest syndrome म्हणून रडत बसलेली दिसत नाही .वाळलेलं पान गळले म्हणून कधी झाड टीप गाळत नाही. खरंतर मनुष्य हाही निसर्गाचाच मुलगा आहे. कुठे प्रयोगशाळा व कारखान्यात बनलेला नाही. मुख्य म्हणजे लहानपणी एखाद्या बाळावर भीती वगैरेचा लवलेशही नसतो तर निष्पापपणा भरून राहिलेला असतो. परंतु जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्यातील निसर्गाचा अंश आपण विसरत जातो, आणि सकारात्मकते पासूनही दूर दूर जायला लागतो. निसर्ग आपला मूळ गुण कधीच बदलत नाही. कडुलिंब कधी गोड लागलेला कुठे बघितले आहे का? किंवा पाणी हे चढावाकडे चढलेल ही कुणी बघितलं नाही.

निसर्गाला कुठल्याच गोष्टीची माहिती म्हणून नाही तर त्याचं रुपांतर ज्ञानमय आहे. शुद्ध ज्ञान पारखून घेणं, सारासार विवेक ज्याला नीरक्षीरविवेक म्हणतात तोही आपण हंसा कडूनच शिकलो. पावसाळ्यात गदुळ झालेल् नदीच पाणी, पावसाळा संपताच नितळ होतं, गाळ खाली बसतो. हा सहज भाव निसर्गात असतोच .तो मानवात मात्र यावा लागतो.तो आला तरच केवळ माहितीचा विस्फोट न होऊ देता त्यातील काय वापरता येईल ? काय वापरायला हवं ? हे विचारात घेऊन प्रत्यक्ष वापर वाढेल, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान अंगीकारण्यात सारखे होईल. आणि जिथे खरोखरीच ज्ञानाचा ज्ञानदीप लागतो, तिथे भीती रुपी अंधाराला स्थान नसतं. तर सगळं कसं उजळून निघतं, लख्ख दिसायला लागतं, िश्‍वासाला जागा देणार असतं. आणि आपसुकच जे दिसतं ते शंभर टक्के खणखणीत विश्वासार्य ! मग तिथे नकारात्मकता जाऊन सकारात्मकता वास करते. म्हणूनच म्हणावसं वाटतं, हे दिपोत्सवा ! तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशात आम्हा सगळ्यांना तू बुद्धि, तेज,नवीन चेतना, ज्ञान आणि विश्वास दे. मनातील नकारात्मकता लयाला जाऊ दे आणि सकारात्मकतेचा उदय होऊ दे .. यामुळे आम्ही ज्यांच्या डोक्यावरचे आभाळ हरवले आहे, त्यांचे सोबती होऊ आणि वाट हरवलेल्याना रस्ता दाखवण्यासाठी सक्षम होऊ !असे ज्ञान तू आम्हाला दे , हीच तुझ्या चरणी प्रार्थना.

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER