‘तुम्ही स्वत:हून नियम बदला, अन्यथा आम्ही ते स्थगित करू’

Sharad Bobde
  • सरन्यायाधीश न्या. बोबडे यांनी सरकारला खडसावले

नवी दिल्ली : ‘ दुभती जनावरे हे उपजीविकेचे साधन असते. ते तुम्ही असे हिरावून घेऊ शकत नाही. एक तर तुम्ही स्वत:हून नियम बदला, अन्यथा आम्ही त्यांना स्थगिती देऊ’, अशा शब्दांत सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे (Sharad Bobde) यांनी सोमवारी केंद्र सरकारला (Central Government) खडसावले.

त्यांनी ही तंबी प्राण्यांना क्रूर वागणूक देण्यास प्रतिबंध करणार्‍या कायद्याखाली (Prevention Cruelty to Animals Act) सरकारने सन २०१७ मध्ये लागू केलेल्या नव्या नियमांच्या संदर्भात होती. या नियमावलीने जनावरांची वाहतूक करणारी वाहने जप्त करून त्यातील जनावरे (सक्तीने) गोशाळांमध्ये पाठविण्याचे अधिकार सरकारी अधिकार्‍यांना दिलेले आहेत. या नियमावलीच्या वैधतेस आव्हान देणारी ‘बफेलो ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन’ने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे. सरन्यायाधीश न्या. बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. सरन्यायाधीशांनी वरीलप्रमाणे सुनावल्यानंतर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल जयंत सूद यांनी सरकारला विचारून उत्तर देण्यासाठी वेळ मागितला. त्यानुसार पुढील सुनावणी आठवड्यानंतर ठेवण्यात आली. आता हे नियम मागे घेणार की त्यात सुधारणा करणार हे सरकारला प्रतिज्ञापत्र करून सांगावे लागेल.

सुनावणीच्या सुरुवातीसच याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी असे निदर्शनास आणले की, गेल्या तारखेला १७ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली तेव्हा या नियमावलीची नेमकी स्थिती काय आहे, हे सूद यांनी सांगणे अपेक्षित होते. त्यावर सूद यांनी अशी माहिती दिली की, या नियमावलीची अधिसूचना यापूर्वीच  प्रसिद्ध झाली असून हे नियम लागू झाले आहेत.

हे ऐकून सरन्यायाधीश न्या, बोबडे सूद यांना म्हणाले की, कुत्रे-मांजरे नव्हेत तरी दुभती जनावरे हे उपजीविकेचे साधन असते. तुम्ही (सरकार) ते हिरावून घेऊ शकत नाही. असे करणे याच कायद्याच्या कलम २९ च्याही विरुद्ध आहे. तुमचा कायदा आणि नियम यांत विरोधाभास आहे. एक तर तुम्ही ते बदला तरी किंवा स्थगित तरी करा.

प्राण्यांचे हाल करण्याचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी आल्या म्हणून तयार होते ते नियम आम्ही लागू केले, असे सूद म्हणाले. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, कायद्याच्या मूळ उद्देशालाच काटशह देणारे नियम, अशी स्थिती अम्ही चालू देणार नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER