तुम्ही लोकांचे आयडॉल, महाराष्ट्राला आपली गरज; मुंबईच्या महापौरांकडून राज ठाकरेंना आवाहन

Kishori Pednekar-Raj Thackeray

मुंबई : गेल्या तीन आठवड्यांपासून मुंबईत दररोज कोरोनाच्या (Corona) नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तीन आठवड्यांपूर्वी ही संख्या तीनशेपर्यंत खाली गेली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढू लागला आहे. मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा सगळ्यांसाठी चिंतेचा विषय झाला आहे.

मुंबईत तर एकाच दिवसात दीड हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. ही वाढती रुग्णसंख्या नक्कीच चिंता वाढवणारी आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar)यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना नियमांचे जास्तीत जास्त पालन करून लॉकडाऊन टाळण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईच्या वरळी परिसरात वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरळी विधानसभा अध्यक्ष संतोष धुरी यांनी 15 दिवसांपूर्वी वरळीतील पबचे व्हिडिओ व्हायरल केले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात वरळी कोळीवाडा येथे करण्यात आलेल्या शूटिंगचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला आहे आणि सर्व नियम हे सर्वसामान्यांसाठी असतात का? पब आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी कुठले नियम लागू नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला होता.

याच पार्श्वभूमीवर महापौरांना प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन मग प्रतिक्रिया देईन असं म्हटलं आहे. या सोबतच महापौरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आवाहन केलं आहे.

‘आपण हजारो लोकांचे आयडॉल आहात. अनेक लोक आपल्याकडे पाहून प्रभावित होतात. महाराष्ट्राला तुमची गरज आहे. त्यामुळे आपण सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना कृपया मास्कचा वापर करावा. आपण मास्क घालत नसल्यामुळे अनेक जण या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाहीत. आपल्या घरातही वयोवृद्ध मंडळी आहेत. या गोष्टी विचारात घेऊन आपण सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना मास्क घालावा, ही हात जोडून विनंती आहे,’ असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER