‘आम्ही रामाचे आंदोलन केले म्हणून तुम्ही सत्तेत आहात’, संजय राऊतांचा भाजपला टोला

Sanjay Raut-PM Modi

मुंबई : केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र हे आंदोलन दडपण्यासाठी केंद्राकडून मोठे प्रयत्न केले जात आहे. एकीकडे विरोधक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी आंदोलक शेतकऱ्यांना आंदोलनजीवी असल्याचे म्हटले आहे. आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामनातील रोखठोकमधून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ‘आम्ही रामाचे आंदोलन केले म्हणून तुम्ही सत्तेच्या सिंहासनावर आहात’, अशी खोचक टीका केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी देशातील आंदोलनाची चेष्टा केली आहे. आणीबाणीपासून अयोध्या आंदोलनापर्यंत. महागाईपासून कश्मीरातील 370 कलम हटविण्यापर्यंत भाजपने सतत आंदोलनेच केली. रामाचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता. त्या भाजपचे पंतप्रधान मोदी ‘आंदोलनजीवी’ अशी खिल्ली उडवतात तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचाही अपमान होतो!, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

आजचा सामनातील रोखठोक…

ज्या लोकशाहीतले रस्ते सुनसान असतात त्या देशाची संसद मृतप्राय होते, असे एक विधान राम मनोहर लोहिया यांनी केल्याचे आठवते. आज लोहियांचे बोल खरे होताना दिसत आहेत. संसद दिवसेंदिवस मृतप्राय होत आहे. कारण रस्ते सुनसान व्हावेत असे फर्मान पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे. देशातील आंदोलने थांबवा. आंदोलने म्हणजे परकीय शक्तीचा कट. काही लोक फक्त आंदोलनांवरच जगत आहेत. ‘आंदोलनजीवी’ असा उल्लेख करून पंतप्रधानांनी रस्त्यावर उतरणाऱया कार्यकर्त्यांची थट्टा केली आहे. ही थट्टा फक्त गाझीपूरला तीन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱया शेतकऱयांची नाही, तर देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मूल्य राखण्यासाठी दीडशे वर्षांपासून आंदोलन करणाऱया प्रत्येकाची थट्टा आहे. आंदोलन हे फक्त रस्त्यावरचेच असते असे नाही. त्याच्या विविध तऱहा आहेत. देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकमान्य टिळकांना 1906 मध्ये शिक्षा झाली. त्या चुकीचे परिमार्जन करण्याचे ठरले. मग हायकोर्टात एक फलक लावला गेला- ‘न्यायालयाने मला दोषी ठरविले असले तरी या न्यायालयापेक्षा श्रेष्ठ असे न्यायालय आहे व त्याच्यापुढे मी निर्दोष आहे.’ या अर्थाची लोकमान्यांची धीरोदात्त वाक्ये या फलकावर कोरण्यात येऊन त्याचे समारंभपूर्वक अनावरण तत्कालीन मुख्य न्यायाधीश एम. सी. छागला यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमान्यांना शिक्षा झाली तेव्हा आपण कुमार होतो आणि चीड येऊन हातात दगड घ्यावा असे वाटले, असे त्या वेळी छागला म्हणाले. म्हणजे लोकमान्यांनी एक आंदोलन केले व न्या. छागला यांच्या मनातही आंदोलनाचे विचार उसळले. ज्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध संताप व स्वाभिमानाची ठिणगी पेटली आहे तोच आंदोलन करतो. बाकी सगळे मग पुचकामीच ठरतात.

गोध्राकांड काय होते?

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे आज ‘आंदोलना’ची खिल्ली उडवत आहेत; पण साबरमती एक्प्रेस जाळल्यावर जे भयंकर गोध्राकांड झाले, त्यातूनच मोदी हे हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले. मोदी यांच्या दृष्टीने गोध्राकांड हे उत्स्फूर्त आंदोलनच होते. हे आंदोलन ‘परजीवी’ आहे असे तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी यांनी म्हटलेले नाही. त्याच ‘गोध्राकांड’ आंदोलनाने मोदी व शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले. त्या मानाने दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱयांचे आंदोलन शांत आणि सौम्य आहे. शिस्त पाळून आहे. हे आंदोलन ‘कॉर्पोरेट व्यवस्था’ आणि भांडवलदारांच्या विरोधात असल्यामुळे शेतकरी बदनाम केला जात आहे. ज्यांना आज शेतकऱयांचे आंदोलन नको आहे त्यांनी स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास तपासायला हवा. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात शेतकरी मोठय़ा प्रमाणावर उतरला होता. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभा केला आहे. ब्रिटिशांच्या विरोधात साराबंदी, बार्डोली सत्याग्रह शेतकऱयांनी केला व त्याचे नेतृत्व वल्लभभाई पटेलांनी केले. पटेलांचे फक्त पुतळे निर्माण करून काय होणार? महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात मोठे ‘आंदोलनजीवी’ होते. कायदेभंग, परदेशी कापडाची होळी, चले जाव, मिठाचा सत्याग्रह अशा अनेक आंदोलनांनी गांधीजींनी देश एका झेंडय़ाखाली एकवटवला, एकजिनसी केला. गांधीजींची उपोषणे हेसुद्धा आंदोलनच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे आंदोलन केले. अस्पृश्यांच्या अस्मितेसाठी लढा दिला. ते आंदोलन नव्हते तर दुसरे काय होते? संसदेच्या आवारात अनेक पुतळे विराजमान आहेत. त्या प्रत्येक पुतळ्याला आंदोलनाचा इतिहास आहे. तो प्रत्येक पुतळा आता जिवंत होऊन सांगत आहे, ‘आम्ही आंदोलने केली म्हणून तुम्ही सिंहासनावर बसला आहात.’

संसदेच्या आवारात

महात्मा फुलेंचा पुतळा संसदेच्या आवारात आहे. स्त्री शिक्षण, शेतकऱयांच्या प्रश्नांवर आंदोलनाची ठिणगी टाकणारे फुलेच होते. फुले जातीभेदाविरुद्ध लढले. आपल्या वाडय़ातील विहीर त्यांनी त्या काळात अस्पृश्यांसाठी खुली केली. हे आंदोलनही मग ‘परजीवी’ वगैरे म्हणायचे काय? गाझीपूरमधील शेतकऱयांचे आंदोलन म्हणजे ‘तमाशा’ असे भाजपचे महाराष्ट्रातील शेतकरी पुढारी पाशा पटेल यांनी बोलावे हे धक्कादायक. न्या. महादेव गोविंद रानडे यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ‘जेथे लोकांच्या म्हणण्याला मान मिळतो तो देश स्वतंत्र. जेथे नाही तो परतंत्र.’ त्या अर्थाने आज येथे कोणी स्वतंत्र आहे काय?

सत्याग्रह!

सत्याग्रह हा हिंदुस्थानने जगापुढे ठेवलेला बंदुकीला वैशिष्टय़पूर्ण पर्याय असल्याचे राम मनोहर लोहियांनी सांगितले. त्या लोहियांचा पुतळाही संसद भवनात आहे. जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीविरुद्ध दुसऱया स्वातंत्र्याचा लढा पुकारला. त्याच आंदोलनाने इंदिरा गांधींची सत्ता उलथवून टाकली. हे आंदोलन परजीवी होते काय? कारण त्याआधी इंदिरा गांधी सातत्याने आदळआपट करीत होत्या की परकीय शक्ती देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदी यांचा ‘परजीवी’ सिद्धांत स्वीकारला तर इंदिरा गांधींचे ते सांगणे खरेच होते. पुढे इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे खून त्याच परकीय शक्तीने केले असे आरोप झाले. आज भारतीय जनता पक्षाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी प्रेमाचे भरते आले आहे. नेताजींचे ‘आझाद हिंद सेना’ हे एक आंदोलनच होते. त्यांनी ‘चलो दिल्ली’ अशी रोमहर्षक घोषणा देत हिंदुस्थानी सैनिकांत स्वातंत्र्याची आकांक्षा पेटविली. ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा!’ ही घोषणा एक आंदोलनच होते. नेताजी बोस दुसऱया महायुद्धाच्या अखेरीस म्हणजे 1945 साली हवाई अपघातात मरण पावले. यानंतर पुढच्याच वर्षी फेब्रुवारी 1946 मध्ये मुंबईत नाविक बंड झाले. त्या बंडामुळे ब्रिटिश सत्तेचा पायाच खचला गेला. हे बंड मुंबईच्या रस्त्यावरही पसरले. ब्रिटिशांनी प्रथमच रस्त्यावर रणगाडे आणले. या वेळी कम्युनिस्ट रस्त्यारस्त्यांवर लढत होते. या रणगाडय़ांसमोर कम्युनिस्ट महिला नेत्या उभ्या ठाकल्या होत्या. त्यात कॉ. कमल दोंडे ठार झाल्या. कॉ. कुसुम रणदिवे यांच्या पायात गोळी घुसली. ती अखेरपर्यंत पायातच होती. या अशा आंदोलनातूनच स्वातंत्र्य मिळाले. देश निर्माण झाला.

निर्भयांचे काय करावे?

पंजाबात लाला लजपत राय हे शेतकऱयांचे नेते होते. ब्रिटिश लाठीमारात ते मरण पावले. महाराष्ट्रात वसंतदादा पाटील, किसन वीर, नाना पाटील ही शेतकऱयांची पोरेच लढा देत होती. प. बंगालात राजा राममोहन रॉय यांनी सामाजिक सुधारणांसाठी लढा दिला. सतीची चाल बंद करावी लागली. हे आंदोलनच होते. दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरण घडले तेव्हा दिल्लीच्या रस्त्यांवर आणि संसदेत आंदोलन करणारे भाजपचेच लोक होते. आता एखाद्या निर्भयावर अत्याचार झाला तर ‘हाथरस’प्रमाणे तिला अंधारात पोलीस गुपचूप जाळून टाकतील व त्या घटनेचे वार्तांकन करणाऱयांना देशद्रोही ठरवतील. अयोध्येत रामाचे मंदिर उभे राहात आहे ते शेकडो करसेवकांच्या बलिदानातून. हे सर्व हुतात्मे परकीय हस्तक किंवा परजीवीच होते, असेच आता म्हणावे लागेल.

मुखर्जींचे बलिदान

देशाला आंदोलनाचा इतिहास मोठा आहे. विद्यार्थ्यांपासून शेतकऱयांपर्यंत. 1 ऑगस्ट 1920 रोजी, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या दिवसापासून गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध असहकार युद्ध सुरू केले. वकील सनदा परत करू लागले. अनेकांनी आपल्या सरकारी पदव्या परत केल्या. शाळा, महाविद्यालये व न्यायालये यावर बहिष्कार टाकण्यात आला. 1921 सालच्या नोव्हेंबरात ब्रिटिश युवराज मुंबईत दाखल झाले तेव्हा हरताळ पडला व तो वाढतच गेला. हे आंदोलन वाढतच गेले. सरकारने प्रचंड दडपशाही केली. पं. मोतीलाल नेहरू, लाला लजपत राय, देशबंधू चित्तरंजन दास असे काँग्रेसचे प्रमुख पुढारी 25-30 हजार लोकांसह तुरुंगात डांबले गेले.
एकेकाळी काँग्रेस पक्ष हेच एक आंदोलन होते. आज काँग्रेस कुठे आहे? काँग्रेसचा इतिहास जितका आंदोलनाचा आणि संघर्षाचा आहे तितका तर भाजपचा नाही. स्वातंत्र्याच्या आंदोलनांत भाजप कुठेच नव्हता. वीर सावरकर यांचे स्वातंत्र्याचे आंदोलन सशस्त्र्ा होते व त्याबद्दल त्यांना इंग्रज सरकारने 50 वर्षांच्या काळय़ा पाण्याची शिक्षा ठोठावली. अंदमानातून सुटल्यावर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, भाषाशुद्धीसारखी आंदोलने केली. वीर सावरकरांना भारतरत्न करण्यात आले नाही. निदान सावरकर परजीवी किंवा आंदोलनजीवी होते असे म्हणू नका. आंदोलन म्हणजे लोकशाहीतील सूर्यकिरणे आहेत. देश त्यामुळे जिवंत राहतो. भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत जी आंदोलने केली त्यांना काय म्हणावे?

भारतीय जनता पक्षाची सर्व आंदोलने झाली. ती मग फक्त राजकीय हितासाठी व सत्ताप्राप्तीसाठीच झाली असे म्हणावे लागेल. कश्मीरातून 370 कलम हटवणे हे भाजपच्या जीवनातले सगळय़ात मोठे आंदोलन होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यासाठी आंदोलन केले व बलिदानही दिले. मुखर्जी यांचे बलिदानही आता ‘आंदोलनजीवी’ ठरवले गेले. क्रांतिकारक सत्तेवर येताच सगळय़ात आधी क्रांतीच्या पिलांचा बळी घेतो. आपल्या देशात हेच सुरू आहे काय? असा प्रश्नही साजणी राऊत यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER