भावनांचा तू भुकेला रे मुरारी

Laziness

हाय फ्रेंड्स ! शाळा सुरू होण्याचे दिवस आले की IQ टेस्टिंग साठी येणाऱ्या पालकांची संख्या वाढते. बुद्धिमत्ता मुलाची चांगली आहे हे कळलं की ते भरून पावतात .सगळं काही जिंकल्याचा आनंद आणि हुश्श ! असे भरून पावल्याचे भाव असतात त्यांच्या चेहऱ्यावर. पण पुढे कधी शाळेतून वागण्यातल्या काही तक्रारी यायला लागतात, किंवा कधीकधी मुलाला लिहायलाच फक्त कंटाळा येतो असंही सांगितलं जातं ,अशावेळी मग सरळ मुलांवर आळशीपणाच लेबल लागतं. पण बौद्धिक दृष्ट्या नॉर्मल असणार्‍या मुलांना पण लिहिण्याचा कंटाळा असेल तर हा डीसग्रफिया पण असू शकतो, किंवा वर्तन समस्यांना मागे इतरही अनेक कारणे असू शकतात हे पालकांना माहीत नसतं.

वागण्या बोलण्या मागे भावनिक बुद्धिमत्ता कमी असणे हेही एक महत्त्वाचे कारण असते.एकूणच एक चांगली व्यक्ती घडवण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता खूप महत्त्वाची असल्याने आज सर्वत्र भावनिक बुद्धिमत्तेलाही महत्व येत चाललेले आहे. पण प्रश्न नेहमीप्रमाणेच येतो. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय आहे ? त्यामागील शास्त्रीय जुजबी माहिती किंवा तिचा मुळात प्रत्यक्ष वापर कसा करायचा ? पुढच्या पिढीचा EQ वाढवायचा कसा ? हे मात्र कळत नाही.

लहानपणी आई-बाबांनी केलेली प्रेमाने निगराणी, त्यांच्या भावनांची घेतलेली काळजी आयुष्यात किती महत्वाची हे सांगणारे हे बोलके उदाहरण. व्हियेतनामच्या युद्धाचा एक दूरगामी परिणाम म्हणजे या युद्धापायी व्हिएतनाम मध्ये निपजलेली अनौरस संतती .या युद्धात अनेक लोक मारले गेले, अनेक कुटुंब परागंदा झाली त्यामुळे कैक मुलं अनाथ झाली .यापैकी काही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी अमेरिकेने स्वीकारली. ही मुलं निरनिराळ्या अमेरीकन कुटुंबातून दत्तक द्यायचं ठरलं. त्यांच्या सुरक्षिततेच्या आणि उत्तम संगोपनाच्या दृष्टीने अनेक कुटुंबांची माहिती आणि त्याची खात्री करून घेतल्यानंतरच ही मुलं त्या कुटुंबांना दत्तक दिली गेली. ही मुलं मोठी झाल्यावर केलेल्या पाहणीत आढळले ,ही काही मुलं त्यांच्या नव्या कुटुंबात फार उत्तम रित्या सामावून गेली होती. तिथे त्यांची वाढही छान झाली होती. पण काही मुलं मात्र तितक्याच सक्षम कुटुंबात राहूनही पार वाया गेली होती .या सर्व मुलांशी केलेल्या चर्चेतून एक वेगळेच सत्य स्पष्टपणे निदर्शनास आलं. युद्धाच्या खाईत होरपळत असताना ज्या मुलांपाशी या वयातही आई बाबांच्या सहवासाच्या प्रेमळ आठवणी जागत्या होत्या ,त्या मुलांना पुढे अनोळखी अशा पालकांशी आणि जीवनशैलीशी ही छान जुळवून घेता आले. ज्या मुलांपाशी आपल्या आई-बाबांच्या अशा प्रेमळ आठवणीच नव्हत्या ,म्हणजेच युद्धकालीन अनौरस मुले,ही मुलं मात्र इतक्या समृद्धीतही स्वतःचे आयुष्य घडवायला असमर्थ ठरली होती.

मला आपल्या संस्कृतीचा ,येथील प्राचीन ज्ञानाचा ,अभ्यासाचा नेहमीच खूप अभिमान वाटत आला आहे.इथे असणारी प्रत्येक गोष्ट परदेशात अफाट किमतीला वेगळ्या नावाने लोकप्रिय होऊन विकली जाते. सध्या आपल्या घरोघरी प्यायली जाणारी दूध हळद, आज परदेशात टर्मरिक लाटे म्हणून लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होऊन खोऱ्याने पैसे ओढते. बाहेरून जे नवीन शोध लागले म्हणून येतात, त्या सगळ्यांची पाळंमुळं आपल्याकडेच आढळतात. पण म्हणतात ना , पिकत तिथे विकत नाही!

पाच ज्ञानेन्द्रिय आणि पाच कर्मेन्द्रिय बरोबरच ,अकरावे इंद्रिय म्हणजे मन !असा ज्ञानेश्वरीत उल्लेख आढळतो,” इंद्रियांआतू अकरावे,मन तें मी हे जाणावे “आपली भावनिक क्षमता म्हणजे आपण स्वतःच्या भावभावनांना नीट ओळखायला शिकणे .त्यातील हिंसक वृत्ती, कपटीपणा ,द्वेष, मत्सर अशा भावनांवर विजय मिळवत आपल्यातील सद्भावना वाढीस लावून त्यांना शिस्त लावणे. यातील भावनांचा उल्लेख ज्ञानेश्वर’ अपैशून्यत्व ‘असा करतात. बरेचदा अत्यंत हुशार पालकही स्वतःमध्ये भावनिक क्षमता न जोपासल्याने , चुकीच्या पद्धतीने वागतांना दिसतात. अनेक ठिकाणी या बाबतीतले अनुभव येतात. काही गृहिणी कडे काम करणाऱ्या मोलकरणी जास्त टिकत नाहीत. काही कंपनी व्यवस्थापकांची वर्कर्स हँडल करण्याची पॉवर खूप छान असते. अशी विविधता का येते ? बघू या !

आपण सगळेजण सकाळी उठल्यापासून कुठल्या न कुठल्या कामात गुंतलेले असतो. या कृती करताना त्यामागे आपली दोन प्रकारची मने कार्यान्वित असतात. एक असतो तर्कशुद्ध विचार करणार मन (rational mind) आणि दुसरा भावना युक्त मन म्हणजे (emotional mind). तर्कशुद्ध मनाच्या माध्यमातून सभोवतालच्या परिस्थितीशी घटनांचे, आपल्याला योग्य ते आकलन होते. भान येते. त्या मनात विचार असतात.ते विश्लेषण करणे ,परीक्षण करणे आणि पुढे जाऊन पुनरावलोकन करणे ही कामे करते. हे मन आपल्या मेंदूच्या विशिष्ट भागात असतं. (लेफ्ट pre frontal cortex) आपल्यामध्येच सभोवतालची परिस्थिती समजून देणार आणखीन एक मन कार्यरत असतं ते भावना युक्त मन ! हे मन अतिशय वेगवान व जबरदस्त शक्तिशाली असतं. मेंदूच्या भावनिक भागात (limbic system) मध्ये हे स्थिरावलेले असून तेथून सूत्र हलवते.हे मन वैचारिक मनापेक्षा ८३ हजार पट वेगाने काम करते. इथे असंख्य भावना केमिकल्स च्या स्वरुपात निर्माण होतात.

भावनांमुळे आपण एखादी कृती करण्यास तात्काळ उद्युक्त होतो. म्हणजे आवेगच असतो तो ! विशिष्ट प्रसंगात निर्णय घेताना भावनिक मेंदूकडून वैचारिक मेंदूकडे पाठवलेला संदेश म्हणजेच आवेग !

लेफ्ट pre frontal cortex हा भाग अगदी डोळे आणि कपाळ पट्टीच्या मागे असणारा. आपले व्यक्तिमत्व, आपली ध्येय ,आपली मूल्य येथे ठरतात. भावनिक आवेगांशीच नाही तर मेंदूच्या विविध भागांशी जोडला गेलेला दिसतो. शरीरातील डोपामाइन, सेरोटोनिन, नॉर्पॉइंनफ्राईन या तीन मूड चे समतोल राखणाऱ्या भागांशी पण जोडलेला असतो. थोडक्यात भावनिक मेंदूकडून आलेल्या आवेगांवर हा वैचारिक मेंदू कंट्रोल करत असला, तरी या दोन भागांना जोडणारे दुवे जर कमकुवत असतील आणि काही कारणाने त्यांना इजा झाली असेल तर समतोल निर्णयात ते कुचकामी ठरून आवेगशील राहतात.

वैचारिक मन तर्कशुद्ध विचार करते तर भावनिक मेंदूत फक्त भावना निर्माण होतात ,भावनिक आठवणींचा साठा असतो. मात्र विचार हा पूर्णपणे वैचारिक मेंदूची मक्तेदारी असली तरी तर्काला भावनेची साथ मिळते ,तेव्हा यांच्या समन्वयातून घेतला जाणारा निर्णय हाच योग्य निर्णय असतो. पूर्ण तर्कावर आधारित कारभार हा शुष्क दडपशाहीचा होतो. तर केवळ भावनेच्या आहारी जाऊन घेतलेल्या निर्णयात वास्तविकतेचा आधार नसल्याने तोंडावर आपटण्याची वेळ येते.

उदाहरणार्थ – दिवाळीचा बोनस सगळ्या घरच्या काम वाल्यांना द्यायचा आहे .दरवर्षीप्रमाणे पगा- राला बरोबरीने पगार देण्याची काही एक गरज नाही. तसंही या दिवाळीत त्यांच्याकडून फार काही काम करून घेणे मला जमलेलं नाही. आणि पंडेमिक काळामुळे यावेळी दिवाळीत सगळीच काटकसर करायची आहे.(पूर्ण वैचारिक मेंदू)

आपल्याला एवढी उपलब्धता आहे ,सुबत्ता आहे. त्यांचे घरात दिवे लागायला हवेत. पगाराला पगार ही तर आपली नेहमीची रीत! प्रत्येकीला पण आपल्याबरोबर यावेळी फराळ बनवून घेऊन देऊया आणि आणि त्यांना आणि त्यांच्या मुलांना कपडेलत्ते आणि फटाके हे पण देऊ. आणि पुर्वी पद्धत होती .त्याप्रमाणे दिवाळीच्या दिवशी सगळ्या या काम करणाऱ्यांना जेवायला बोलावू…!(पूर्ण भावनिक मेंदू )

हे दोन्ही टोकाचे विचार ! यांचा समन्वय ,समतोल म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता !

थोडक्यात भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे मेंदूच्या भाषेतील लेफ्ट प्रि फ्रांटल कॉर्टेक्स आणि भावनिक मेंदू म्हणजे लिंबिक सिस्टिम यांच्या मधील समन्वय, समतोल आणि सुसंवाद असं म्हणता येईल. म्हणजेच विचारांना भावनांचं कोंदण हे हवंच ! प्रत्येक माणसात वसलेल्या हरीला भावपूर्ण भक्तीनेच जिंकता येतं, तोही भावनेचा भुकेला असतोच!

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER