सावरकरांचे गौरवोद्गार काढल्याबद्दल सोमण यांना शिक्षा देणे दुर्दैवी – फडणवीस

Devendra Fadnavis-yogesh-soman-uddhav thackeray

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य आणि संपूर्ण देशाला ज्यांच्या वीरतेचा सार्थ अभिमान आहे, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत गौरवोद्गार काढल्याबद्दल एखाद्या अधिकार्‍याला थेट सक्तीच्या रजेवर पाठविणे, हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारा आहे. त्यामुळे यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे आणि त्यांच्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात फडणवीस म्हणाले की, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या थोरपुरुषांची थोरवी कुणी सांगायचीच नाही का, असा प्रश्न अशा घटनांमुळे उपस्थित होतो आहे. मुंबई विद्यापीठातील अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे संचालक योगेश सोमण यांना या अजब मानहानीला सामोरे जावे लागले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल योगेश सोमण यांनी गौरवोदगार काढल्यानंतर त्यांच्याविरुद्ध काँग्रेसप्रणीत एनएसयूआय या संघटनेने आंदोलन केले आणि ते आंदोलन मागे घेण्यासाठी थेट सोमण यांनाच सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ प्रशासनाने घेतला.

योगेश सोमणप्रकरणी मुंबई विद्यापीठाचा ‘यू टर्न’; प्रा. गणेश चंदनशिवे प्रभारी संचालक

हा निर्णय तमाम देशभक्तांना प्रचंड वेदना देणारा आहे. मध्यप्रदेशातसुद्धा एका प्राचार्यांना अशीच शिक्षा भोगावी लागत आहे, हेही आपल्याला माहीत असेल. अशात महाराष्ट्रात आपल्यासारखे वीर सावरकरांच्या विचारांवर निष्ठा असणारे मुख्यमंत्री असताना किमान असा प्रकार होणे अपेक्षित नाही. एवढेच नाही तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमक्यासुद्धा दिल्या आहेत. हा अन्यायकारक प्रकार तत्काळ थांबवावा आणि तसे निर्देश आपण मुंबई विद्यापीठाला द्यावेत. कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कृपया या प्रश्नात आपण लक्ष घालावे, अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.