“हो, मी भाजपा नेत्याला फोन केला पण…”; ममता बॅनर्जीची स्पष्टोती

Mamata Banerjee

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपा नेते प्रलय पाल यांनी गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी फोन करून नंदीग्राममधील विजयासाठी मदत मागितली असल्याचा दावा प्रलय पाल यांनी केला आहे. पाल यांच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर ममता बॅनर्जींनी स्पष्टीकरण दिले आहे. “हो, मी भाजपा नेत्याला फोन केला होता.” असे ममतादीदी म्हणाल्या.

“तृणमूल काँग्रेसचे माजी नेते जे भाजपामध्ये दाखल झाले, त्यांना फोन केला होता. फोन करणे कोणताही गुन्हा नाही. दोषी त्यांना ठरवले पाहिजे, ज्यांनी विश्वासघात केला आणि गौप्यस्फोट केला. हो, मी नंदीग्राममधील एका भाजपा नेत्याला फोन केला होता. कोणाला तरी बोलायचे आहे, असे सांगण्यात आले होते. यामुळे त्यांचा नंबर घेऊन फोन केला होता. तुम्ही तिथे व्यवस्थित रहा आणि आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असे मी म्हणाली. हा काय माझा गुन्हा आहे का?” असा सवालदेखील ममता बॅनर्जींनी केला आहे.

“मतदारसंघातील उमेदवार असल्याच्या नात्याने मी कोणत्याही मतदाराची मदत घेऊ शकते. मी कोणालाही फोन करू शकते. यात वाईट काय आहे. यात कोणता गुन्हा नाही. पण जर कोणी बातचीत लीक करत असेल, तर तो गुन्हा आहे. हा गुन्हा माझ्याविरोधात नाही, तर त्या व्यक्तीविरोधात करा, ज्याने माझ्याशी झालेली चर्चा लीक केली.” असेदेखील ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार शुभेंद्रू अधिकारी लढत आहेत. प्रलय पाल यांनी हा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे.

“ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सकाळी मला फोन केला. नंदीग्राममध्ये मदत करण्याची विनंती त्यांनी केली. मी त्यांच्यासाठी काम करावे आणि टीएमसीमध्ये प्रवेश करावा, असे ममता बॅनर्जींचे म्हणणे होते. परंतु मी गेल्या अनेक वर्षांपासून शुभेंदू अधिकारी यांच्या कुटुंबासोबत आहे. आता मी भाजपासाठी काम करत आहे. डाव्यांच्या सत्तेच्या काळात अत्याचार वाढले होते. तेव्हा नंदीग्रामच्या जनतेच्यापाठी फक्त अधिकारी कुटुंबच उभे राहिले. मी कधीच अधिकारी कुटुंबाच्या विरोधात गेलो नाही आणि यापुढेही कधी अशी हिंमत करणार नाही. नंदीग्राममधील लोकांना टीएमसीने कधीच त्यांचा अधिकार मिळवून दिला नाही. त्यामुळे मी भाजपाची सेवा करत राहणार आहे.” असे पाल यांनी स्पष्ट केले. या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही भाजपाने व्हायरल केली आहे. या क्लिपमधील आवाज व्हेरिफाईड नसल्याचे टीएमसीने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button