हो, मीसुद्धा कर्नाटकचाच आहे! दुसरे न्यायाधीश आणायचे कुठून?

Karnataka High Court
  • आचरट याचिकाकर्त्यास मुख्य न्यायाधीश ओक यांनी खडसावले

बंगळुरु: पूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयात ( Karnataka High Court)वकिली करणार्‍या वकिलांमधून झालेले या न्यायालयाचे सर्व न्यायाधीश पक्षपाती आहेत. त्यांच्याकडून न्याय मिळण्याची आशा नाही. त्यामुळे एक तर माझ्या याचिकेवर (राज्याबाहेरून आलेल्या) मुख्य न्यायाधीशांनी  स्वत: सुनावणी घ्यावी किंवा ते काम राज्याबाहेरच्या एखाद्या न्यायाधीशाकडे सोपवावे, अशी आचरपणाची व उघडपणे न्यायालयीन अवमान करणार्‍या एका याचिकाकर्त्यास कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. अभय श्रीनिवास ओक (Srinivasa Oak) यांनी चांगलेच फैलावर घेतले.

याचिकाकर्त्याचे हे प्रतिपादन नक्कीच त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन बेअदबीची (Contempt of Court) कारवाई करण्यायोग्य आहे. पण (कोणीही, कसेही बेपर्वाईने वागले तरी) उच्च घटनात्मक पदावर बसणाºयांनीच मनाचा मोठेपणा दाखवायला हवा, असे म्हणत न्या. ओक यांनी अशी कारवाई न करता या याचिकाकर्त्याची याचिका फेटाळली व त्याला एक लाख रुपये दंड केला.

व्ही. गुरुराज या याचिकाकर्त्यास फैलावार घेत मुख्य  न्यायाधीश न्या. ओक म्हणाले, मुख्य न्यायाधीश राज्याबाहेरचे असतात म्हणून (तुमच्या याचिकेवर’) त्यांनी सुनावणी घ्यावी, असे तुम्ही म्हणता. पण इथे मुख्य न्यायाधीश झाल्यापासून मीही कर्नाटकचाच झालो आहे, असे मी मानतो. तसे मी अनेक वेळा सांगितलेले आहे. त्यामुळे आता मुख्य न्यायाधीशही कर्नाटकचेच आहेत म्हटल्यावर तुम्ही जाणार कोणाकडे?  आम्ही सर्वच न्यायाधीश कर्नाटकचे आहोत. मग तुमची याचिका ऐकण्यासाठी न्यायाधीश कोण मिळणार?

मुख्य न्यायाधीश न्या. ओक व न्या. सचिन शंकर मगदूम यांच्या खंडपीठापुढे हे नाट्य घडले. गुरुराज यांची आणखी एक याचिका न्या. कृष्णा एन. दीक्षित यांच्यापुढे प्रलंबित आहे. त्यांनी सुनावणी करू नये, अशी विनंती गुरुराज यांनी न्या. दीक्षित यांना केली. पण त्यांनी त्यास नकार दिल्याने गुरुराज यांनी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे ही याचिका केली.
या याचिकेत गुरुराज यांनी असे वारेमाप आरोप केले की, या न्यायालयात पूर्वी वकील असलेले आता जे न्यायाधीश झाले आहेत ते सर्व पक्षपाती आहेत. मुळच्या कर्नाटकच्या असलेल्या व आता निवृत्त झालेल्या भारताच्या एका माजी सरन्यायाधीशांचे हे सर्व न्यायाधीश मिंधे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मला न्याय मिळण्याची अपेक्षा नाही.

याची गंभीर दखल गेत मुख्य न्यायाधीश न्या. ओक यांच्या खंडपीठाने म्हटले की, गुरुराज ज्या न्यायाधीशांबद्दल बोलतात तेही माणूस आहेत. त्यामुळे विद्वान निवृत्त सरन्यायाधीशांविषयी त्यांच्या मनात आदर असणे हे स्वाभाविक आहे. पण त्याच बरोबर हेही लक्षात घ्यायला हवे की, या न्यायाधीशांनी संविधानानुसार न्याय करण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे  त्यांना ज्यांच्याविषयी आदर आहे त्या व्यक्तीच्या आहारी जाऊन ते आपली संवैधानिक जबाबदारी पार पाडण्यात कुचराई करतील, असे मानणेच सर्वस्वी अनुचित आहे.

न्यायालयीन अवमानाची कारवाई न करता केवळ दंड केला हा आमचा दुबळेपणा मानू नये, असे गुरुराज यांना बजावून खंडपीठाने असा आदेश दिला की, गुरुराज यांनी त्या एकल न्यायाधीशांपुढे (न्या. दीक्षित) जाऊन तेथे केलेले अशाच प्रकारचे आरोप एक आठवड्यात बिनशर्त मागे घ्यावेत. अन्यथा त्यांच्यावर न्यायालयीन अवमाननेची कारवाई करण्याचा आमचा मार्ग मोकळा आहे.

अस्सल मराठी, बाणेदार न्यायाधीश

मुख्य न्यायाधीश न्या. ओक अस्सल मराठी असून ते मुळचे ठाण्याचे आहेत. त्यांना न्यायदानात असा कणखर बाणेदारपणा दाखवण्याची आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे. ‘पर्यावरण संरक्षण कायदा संसदेने परकीय शक्तींच्या दबावाखाली येऊन केला आहे आणि भारताची होत असलेली भरभराट बघवत नाही म्हणून पर्यावरणाच्या मुद्द्यांवर न्यायालयांमध्ये .याचिका करून विकास कामांना खीळ घालणार्‍या यच्चयावत सर्व पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्था या परकीय शक्तींच्या हस्तक आहेत’, असे धक्कादायक विधान प्रतिज्ञापत्रात शपथेवर करणार्‍या भारतीय महामार्ग विकास प्राधिकरण (NHAI) या केंद्र सरकारी संस्थेसही त्यांनी असेच फैलावर घेतले होते. कर्नाटकला मुख्य न्यायाधीश म्हणून जाण्याआधी न्या. ओक मुंबई उच्च न्यायालयात १४ वर्षे न्यायाधीश होते. निस्पृहता आणि कणखरणाबरोबरच कामाचा प्रचंड उरक असलेले (Workaholic) न्यायाधीश अशी त्यांची ख्याती आहे. मुंबईहून जाताना शिल्लक असलेले सर्व काम संपवूनच जायचे असे ठरविल्याने न्या. ओक यांचे कर्नाटकमधील पदग्रहण काही दिवस उशिराने झाले होते.

-अजित गोगटे

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER