हो ! मी गृहिणीच आहे

परिवा शोभा कडे गेले होते. बरोबर माझी मैत्रीण होती. ती सिनिअर सिटीजन (Senior Citizen) साठी मेमरी क्लब चालवते. तिची शोभाशी ओळख करून दिली. तिची स्वतःची ओळख करून देताना शोभा कसंनुसं हसून म्हणाली,” हो ,मी घरीच असते.”गृहिणीच (Housewife) आहे. त्या हसण्यात आणि गृहिणीच म्हणण्यात मला एवढा अपराधी भाव दिसला. ते बघून मला अतिशय वाईट वाटलं. मी तिची खास ओळख करून दिली. उत्तम क्रोशा काम करणारी ही माझी मैत्रीण ,अप्रतिम पुरणपोळ्या खाव्यात तर तिच्याच हातच्या! मागच्या दसऱ्याला हिने मातोश्री वृद्धाश्रमा मध्ये सगळ्यांना पुरणाच्या पोळ्या खाऊ घातल्या.

मुळात शोभा अकॅडमीकली अत्यंत हुशार ! पण कुटुंबाची गरज म्हणून चांगले उच्च पद मिळालेले असूनही तिने ते सोडले. म्हणजे तिच्या कर्तृत्वाबद्दल, क्षमतेबद्दल कुठे शंका घेण्यासाठी गोष्टच नव्हती .पण तरी ही तसं हसू येतच .याला जबाबदार कोण ?

बहुतेक शाळेत सगळ्यांनाच मोठेपणी तुम्ही कोण होऊ इच्छिता ? असं विचारतात. मला माझे शालेय दिवस आठवले. वर्गात कोणी डॉक्टर ,कोणी इंजिनिअर ,वकील असं बरंच काही सांगत होते. मला विचारलं तेव्हा मी सांगितलं होतं “जेंटल वूमन ! “सभ्य स्त्री, किंवा चांगली व्यक्ती चांगली गृहिणी मला अपेक्षित असावं. नंतर परत एक परीक्षांमध्ये मेरीट आले. पुढे जेव्हा हा फक्तच गृहिणी बनवायची वेळ आली, तेव्हा मात्र हळूहळू गृहिणी बनवण्याचे सगळे तोटे जाणवले. नंतर पुढे शिक्षण घेतले .काही वर्ष नोकरी केली .आता व्यवसाय करते. स्वतःची प्रगती केली. आता घरातच क्लिनिक चालवते आणि लिखाण करते. सोबत माझे इतर छंद असतातच.

थोडक्यात मी या सगळ्या फेजेस मधून गेले. तेव्हा जाणवतं की स्वतःला प्रूव्ह केल्यानंतर एक प्रकारचा आत्मविश्वास येतो .चार दोन पैसे हाताने कमवायला लागलात की घरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. थोडं घरा बाहेर पडल्याने आज बाहेर कसं वातावरण आहे ते कळतं. भिडस्तपणा कमी होऊन वेगवेगळ्या लोकांची, स्वभावाची ओळख होते.” मी स्वतः खूप हुशार आहे ” असं असून भागत नाही. तर चार जणांना ते prove करावच लागतं. फक्त गृहिणी पण जेव्हा एखादी स्त्री सांभाळते यावेळी,”ती तर घरीच असते” असे नेहमी गृहीत धरले जाते आणि या गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो. म्हणजे केव्हाही या, खा , प्या. मुक्काम करा किंवा टाईमपास करा .कुठल्याही व्यक्तीला दवाखान्यात आणायचं तर गृहिणी कायम डबे पोहोचवणारे असते. आणि अशा अनेक गोष्टी! खरंतर या सगळ्या गोष्टी करायला तिलाही आवडतात. त्रास होतो फक्त गृहीत धरण्याचा !

घरातल्या कामांची पूर्ण जबाबदारी तिचीच आणि घरीच असल्याने घरच्यांच्या सगळ्या अपेक्षा मग त्या कितीही गैरलागू असू देत पूर्ण झाल्यास पाहिजे ही अपेक्षा असते. सदैव तत्परता दाखवताना तिची स्पेस,तिचे एक व्यक्ती म्हणून अस्तित्व, किंवा कुठल्याही निर्णयाच्या वेळी एक साधं मत विचारण तेवढंही घडत नाही. (कारण तसंही तुम्हाला काय कळत आहे त्यातलं ! हा पवित्रा अजूनही बदललेला नाही) बरेचदा तर घरच्या छोट्या छोट्या, खरं म्हणजे तिच्या प्रांतातल्या, गोष्टींबद्दलही निर्णय ,घरातले ती सोडून सगळे घेत राहतात. मग अगदी झाडांना पाणी द्यायला हव आहे का? घरात येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था, अशा बारीक निर्णयात ही तिला पूर्ण स्वातंत्र्य दिले जात नाही. तेही नकळत )

याउलट कमीत कमी काही बाहेर काम करणारी असेल तर ,”असं करतोय हे तरी सांगण्याची तसदी लोक घेतात.” नवविवाहीत मुलगी घरात येते. त्यावेळी ती घरीच राहणारी असेल तर “रोज रोज कसरत तारेवरची”प्रचंड प्रमाणात करावी लागते. याउलट कमीत कमी अकरा ते पाच घराबाहेर राहणे असेल तर तुलनात्मकदृष्ट्या हे सगळं खूपच सोपं होऊन जातं. पुन्हा मान आदर मिळतो तो वेगळाच ! (ही गोष्ट साधारण आज ज्यांची वय 40 च्या आसपास, आणि वर आहेत त्यांच्याबद्दलची.) आत्ताच्या कुणीच नवविवाहिता फारशा पूर्णवेळ गृहिणी राहणाऱ्या नसतात. अपवाद वगळता. त्यांचा एकूण पॅटर्नच खूप वेगळा आहे. त्याविषयी आपण नंतर बोलणार आहोत.

पण फ्रेंड्स या सगळ्या फेजेस मधून गेल्यानंतर आज मला काय वाटतं ?

मी आज जेव्हा घरातली कुठलीही गोष्ट करते, तेव्हा ते निश्चितपणे अतिशय नेटकी ,व्यवस्थित आणि योग्य ठरेल अशी असते .म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे घरातील स्त्रीचे असलेले बारीक लक्ष खूप वेगळे आणि मोलाचे आहे. आणि यातला फरक निश्चितपणे जाणवण्याएवढा असतो.

आता प्रश्न उरतो तो मानसन्मान मिळत नाही. गृहीत धरलं जातं याचा. मी म्हणेल की जोपर्यंत मी मला स्वतःला गरीब बिचारी समजणे किंवा माझे केर पोतेरे करून घेणे सोडणार नाही तोपर्यंत इतर लोक ते करणारच ! मुळात आत्मसन्मान जोपासणे ही गोष्ट आपली आपल्यालाच करावी लागणार आहे. ते करण्याची जबाबदारी माझी स्वतःची आहे. या बाबतीत मला खूप अडचणी असतात.

* मी संवेदनशील असते, कोणी बोललेलं सहन होत नाही, उलट उत्तर द्यायची नाही असा संस्कार असतो. आणि तरीही राग येतो. आणि मी पॅनिक होते. का ? तर मी माझी किंमत समजावून द्यायला कमी पडते. दुसरी गोष्ट एखादी गोष्ट जर नाही आवडली ,नसेल करायची तर मला नाही म्हणायला जमत नाही. आणि मग कधी कधी फार चुकीच्या मार्गाने मत मांडलं जातं.
फ्रेंड्स ! म्हणूनच मुख्य म्हणजे आपल्या विचारात स्पष्टता हवी. मग माझी बाजू स्पष्टपणे पण शांतपणे म्हणजेच दुसऱ्याला न दुखवता सांगणे मला जमायला हवे.
*मी एक व्यक्ती आहे ही जाणीव जेव्हा मी स्वतः ठेवते, तेव्हा ती इतरही ठेवतात. माझे मत कुठल्याही विषयात स्वतंत्रपणे बनवायला हवे. माझं शेड्युल, माझ्या वेळा याबाबत नेहमीच तडजोड करण्याची गरज नाही. मी नेहमीच म्हणते आहे, कारण गृहिणी ही घराचा खांब आहे. जो कायम घरात उभा असावा लागतो. माझ्या जबाबदारी मधला सगळ्यांच्या वेळा पाळणे हा एक भाग आहे. म्हणून तो न नाकारता , काहीवेळा आपल्याहीसाठी इतरांनी तडजोड करायला लागणे यात गैर काही नाही.
* छोटे छोटे निर्णय स्वतःच्या मनाने घ्यायला सुरुवात करायला हवी. म्हणजे हळूहळू सवय होते.
*माझी इच्छा काय आहे मला काय करावं वाटतं याचा विचार करायला लागायला हवं.
*केवळ गॉसिपिंग, केवळ घराची स्वच्छता, केवळ टाईमपास नाही. आपल्या कर्तृत्वाची जाण आपण ठेवून थोडा स्वतःसाठी वेळ काढून स्वतःचे व्यक्तिमत्व फुलवत न्यायला काय हरकत आहे ?
*रिकाम्या वेळामध्ये चार पैसे मिळवता आले आणि पायावर उभे राहता आले सोन्याहून पिवळे कारण त्याने व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी येते आणि स्वतःची एक ओळख निर्माण करता येते. आज-काल संसाराला मदत असलेली केव्हाही चांगली. आणि गरज जर नसेल तर चार जणींना आपण रोजगार देतो आहे. अश्या साठी ही स्वतः चा पायावर उभे राहणे ही गोष्ट चांगली.
*बहुश्रुतता ही खूप ऐकण, वाचणं, पहाणं , अनुभव घेणं यातून मिळवता येते . का म्हणून त्याच त्याच विषयांमध्ये घोटाळत बसायचं?
म्हणूनच अभिमानाने सांगा मी गृहिणी आहे. तुमच्याकडे बघून वाटायला हवं,” येस ! गृहिणी असाव तर हिच्या सारखं !”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.