येलेना ओस्टापेंकाने अखेर पहिल्या फेरीच्या पुढे मजल मारली

jelena ostapenko

2017 मध्ये पटकावलेले थेट अजिंक्यपद वगळता फ्रेंच ओपनची (French Open) एकदाही पहिली फेरीसुध्दा पार न करु शकलेली लाटव्हियाची (Latvia) टेनिसपटू येलेना ओस्टापेंको (Jelena Ostapenko) हिने आपल्यावरील अपयशाचा हा डाग यंदा पुसून टाकला आहे. तिने फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत जगातील चौथ्या क्रमांकाची कॕरोलिना (Karolina Pliskova) प्लिस्कोव्हा हिला 6-4, 6-2 असा पराभवाचा धक्का दिला. तिचा पुढचा सामना आता स्लोन स्टिफन्स किंवा पौला बेदोसा हिच्याशी होईल.

ओस्टापेंको हिने 2017 मध्ये मानांकन नसताना ही स्पर्धा जिंकून सर्वांना चकित केले होते. बिगर मानांकित महिला खेळाडूने फ्रेंच ओपन जिंकण्याची 1933 नंतरची ती पहिलीच वेळ होती. मात्र त्याच्याआधी व त्याच्यानंतरही ओस्टापेंकोची ग्रँड स्लॕम स्पर्धांतील कामगिरी यथातथाच राहिली आहे आणि नंतर केवळ एकदाच ती ग्रँड स्लॕम स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. फ्रेंच ओपनमध्ये तर 2017 चे यश सोडले तर ती पहिली फेरीसुध्दा पार करू शकलेली नव्हती.

प्लिस्कोव्हा ही चांगली खेळाडू आहे म्हणून मी आक्रमक खेळतानासुध्दा फार चुका होऊ नयेत याची काळजी घेतली. माझा सर्वोत्तम खेळ मला करावा लागला असे ओस्टापेंकोने म्हटले आहे.

ती सध्या जागतिक क्रमवारीत 43 व्या स्थानी असून टॉप फाईव्हमध्ये पुन्हा स्थान मिळवण्याचे ध्येय तिने बाळगले आहे. 2017 मध्ये सिमोना हालेपला नमवत फ्रेंच ओपन जिंकायच्या आधी ती पहिल्या 50 मध्ये होती. मात्र फ्रेंच ओपन विजेतेपदाने तिला पहिल्या पाचात पोहोचवले होते. 2018 मध्ये तिने विम्बल्डनची उपांत्य फेरीसुध्दा गाठली होती. पण नंतर ती फारसे यश मिळवू शकलेली नाही. त्यामुळे ती क्रमवारीत 80 च्या खाली घसरली होती. मात्र यंदा तिची कामगिरी चांगली होत आहे. आपण पुन्हा ग्रँड स्लॕम स्पर्धा जिंकू शकतो आणि टॉप फाईव्हमध्ये येऊ शकतो असा तिला विश्वास आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER