यवतमाळ संमेलनाचा बुढीचा चिवडा…🤣

काही गोष्टी भविष्याचे संकेत देत असतात… यवतमाळ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड झाल्यानंतर यजमानांचे काही प्रतिनिधी ढेरेबाईंना भेटायला गेले. त्यांनी म्हणे अगदी वैदर्भीय थाटात त्यांचे स्वागत केले आणि विदर्भाची ब्रँड असलेली पुडाची वडी त्यांना खाऊ घातली! यवतमाळकरही काही कमी नव्हते. त्यांनी आपल्या पिशवीतून बाहेर काढला बुढीचा चिवडा😇 यवतमाळात हा बुढीचा चिवडा फार प्रसिद्ध आहे. तो स्वीकारताना अरुणाताई स्वाभाविकच आनंदित झाल्या असणार. पण त्यांना काय ठावूक, पुढे संमेलनाचाच चिवडा होणार आहे ते😎
उद्घाटक नयनतारा सहगल यांच्यावरून जे घडले-घडत आहे ते तमाशापेक्षा कुठेही कमी नाही बघा! आधी सहगल यांना निमंत्रण गेले, नंतर ते मागे घेण्यात आले. त्यामुळे साहित्य वर्तुळात सुनामीच आली! कोणी ही बाजू घेत आहे, कोणी ती बाजू. कोणी याला दोष देत आहे, कोणी त्याला. कोणी सरकार, भाजपा, संघ परिवार यांना धारेवर धरत आहे, कोणी श्रीपाद जोशींना. मध्येच कोणीतरी स्थानिक आयोजकांवर टीका करीत आहे. कालपासून नुसता गोंधळ सुरू आहे. लहान मुलांनी बुढीचा चिवडा चिवडावा तसा!

याप्रकरणी देशभरात महाराष्ट्राची, मराठी संस्क्रुतीची, मराठी माणसाची गाडाभर इज्जत गेली, हे सर्वात महत्त्वाचे आणि मराठीसाठी मानहानिकारक आहे. खरे कारण कोणतेही असो, नव्वदी पार केलेल्या एका मराठी कन्येचा आपण माहेरच्यांनीच अपमान केला आहे. ही आपली आज देशभर झालेली प्रतिमा आहे. साहित्य संमेलनाचे हे फलित असेल तर यापुढे संमेलन भरविण्याच्या भानगडीत आपण न पडलेलेच बरे🙏

आणिबाणीच्या काळात दुर्गा भागवतांनी घेतलेला सरकारविरोधी पवित्रा आपल्या कौतुकाचा विषय आहे. तोच न्याय सहगल बाईंनाही लावणे क्रमप्राप्त आहे. त्यांच्या भाषणातील मुद्यांना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तेथेच समर्थपणे उत्तरे दिली असती तर ते जास्त शोभून दिसले असते. पण ही संधीच निर्माण होण्यात अडचण आली आणि आता संमेलनाचीच शोभा झाली! याला जबाबदार सर्व संबंधितांचा त्यासाठी तीव्र निषेध!

चिवडा झालेल्या यवतमाळ संमेलनाची रया आता गेली आहे. बुंदसे गयी वो हौदसे नही आती…! प्रत्येक संमेलनात काही ना काही खुसपट निघून तमाशे होणार असतील तर मराठी साहित्य संमेलनांचे प्रयोजनच काय? बंगाली बांधव नागपुरात येऊन विश्व बांगला संमेलन शांतपणे पार पाडतात आणि आम्हाला स्वत:च्या घरात स्वभाषेचे संमेलन नीट करता येत नाही? लाज वाटते आम्हाला मराठी म्हणवून घेण्याची👎

 

 

@विनोद देशमुख ९८५०५८७६२२