यशवंत मराठी बाणा सर्व क्षेत्रात हवाय…

UPSC

Shailendra Paranjapeकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलकी सेवापरीक्षेमधून उत्तीर्ण झालेल्यांमधे महाराष्ट्रातल्या ८० ते ८५ जणांनी सुयश मिळवले आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा झेंडा या तरुण-तरुणींनी फडकावला आहे. यथावकाश हे सर्व जण प्रशासकीय सेवांमधे रुजू होण्यापूर्वीचं प्रशिक्षण घेतील आणि सेवेत रुजूही होतील. महाराष्ट्राचं, देशाचं नाव मोठं करा, नोकरशाही वा ब्युरोक्रसी ही पोलादी चौकट संविधानाच्या आधारे काम करताना मानवी चेहरा असलेली बनण्यासाठी योगदान द्या, अशा शुभेच्छा या सर्वांना देऊ यात.

देशामधे महाराष्ट्राचं (Maharashtra) स्थान महत्त्वाचं आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत. महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले किंवा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला, अशी वाक्य आपण ऐकलेली वाचलेली असतात. देशाच्या दृष्टीनं अनेक संकटाच्या-कसोटीच्या प्रसंगांमधे महाराष्ट्रानं, म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतून घडलेल्या नरवीरांनी, शलाकांनी देशाला हात दिला आहे. अर्थात, संकटप्रसंगी धावून जातानाच, विविध क्षेत्रात फर्स्ट म्हणजे देशात पहिल्यांदाच अशी ख्याती मिळवणाऱ्या गोष्टीही महाराष्ट्रानं यापूर्वी केल्या आहेत.

मुलींची पहिली शाळा सुरू करणारे आणि स्त्री-शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले असोत की पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी वा अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अदिती पंत (Indian woman Aditi Pant) असोत, महाराष्ट्रातल्या महिलांनीही आपण कोणत्याच बाबतीत मागं नाही, हे वेळोवेळी सिद्ध केलंय.

त्यामुळं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत म्हणजे यूपीएससीच्या परीक्षेत सुयश मिळवणाऱ्या या सर्वांनी महाराष्ट्राची मान ताठ केलीच आहे पण त्याबरोबरच दुसऱ्या एका गोष्टीकडंही लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे डॉक्टर इंजिनियर सीए व्हायचं, वैयक्तिक पातळीवर मोठं व्हायचं, या स्वप्नाबरोबरच सरकारी नोकऱ्यांमधे अधिकाराची पदं महाराष्ट्रीयन तरुण-तरुणींनी मिळवाला हवीत. याबरोबरच लष्करी सेवेत तसंच एनडीए किंवा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधेही मराठी टक्का वाढायला हवा, याची आठवण करून दिलीय.

हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला पण तो धावताना त्यात केवळ यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या संरक्षणमंत्र्याचं योगदान असून उपयोग नाही. लष्करी सेवेतही विविध पातळ्यांवर आणि तीनही दलांमधे मराठी माणसं मोठ्या संख्येनं दिसायला हवीत. मराठी माणूस लढवय्या आहेच पण आपापसात लढण्यापेक्षा, प्रादेशिक-संकुचित लढाया करण्यापेक्षा राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवायला हवा. आपल्या क्षमतांना सुयोग्य अवकाश शोधायला हवं. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात मराठी माणूस टॉपला आहे, हे चित्र दिसायला हवं. तसं झालं तर या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश मिळवलेल्या यशस्वींचं यश सार्थकी लागेल.

महाराष्ट्रामधे सनदी अधिकाऱ्यांमधे मराठी माणसांचं प्रमाण वाढलं तर त्याचे परिणाम समाजजीवनामधे उमटलेले दिसतीलच. पण त्याहीपेक्षा राष्ट्रीय पातळीवर सर्वच क्षेत्रात मराठी माणूस पुढे गेला, मोठा झाला तर देशही वेगाने प्रगती करण्यात महाराष्ट्राचं योगदान खूप मोठं होऊ शकेल. ते तसं व्हायला हवं आणि म्हणूनच या सर्व यशवंत, गुणवंत कीर्तीवंतांकडून आपण सर्वांनी, विशेषतः आज दहावी-बारावीच्या वयात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यायला हवी.

दोन शब्द या सर्व यशवंतांसाठी… महाराष्ट्राला थोर सनदी अधिकाऱ्यांची परंपरा आहे. अगदी मुख्यमंत्र्यांनाही फाइल नोटिंगवर एखादी गोष्ट करणं शक्य नाही आणि तुम्ही आग्रह धरलात तर अडचणीचं होऊ शकेल, हे बजावण्याचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची परंपरा मराठी अधिकाऱ्यांची आहे. असा कणा राखण्याचं, तो तसा राखूनही काम करता येतं, हे लक्षात ठेवण्याचीही आज खरी गरज आहे. हे लक्षात ठेवा, येणारा काळ तुमचाच आहे. शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER