‘धर्मपुत्र’ची रिमेक बनवणार यशराज फिल्म्स

यश चोप्रा यांनी 1961 मध्ये धर्मपुत्र (Dharmaputra) नावाचा चित्रपट तयार केला होता. रहमान, शशी कपूर, माला सिन्हा अभिनीत हा चित्रपट फाळणीच्या वेळी दोन धर्मात उसळलेल्या दंगलीवर आधारित आहे. दोन धर्मातील एकता दाखवणारा हा चित्रपट होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आणि उत्कृष्ट संवादासाठी अख्तर उल इमान यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटावर आधारित चित्रपटाची योजना यशराजने आखली आहे. ठग्स ऑफ हिंदुस्तान चित्रपटाचा दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य याच्याकडेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून विकी कौशलची (Vicky Kaushal) यशराज फिल्म्समध्ये एंट्री होत आहे, त्याची नायिका म्हणून मानुषी छिल्लरला (Manushi Chillar) साईन करण्यात आले आहे. मानुषीचा यशराजसोबत हा दुसरा चित्रपट आहे. यशराजच्याच पृथ्वीराजमधून ती अक्षयकुमारची नायिका म्हणून समोर येणार आहे.

दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य ‘धर्मपुत्र’ चित्रपटाने प्रचंड प्रभावित आहे. सध्या समाजात जो धार्मिक वाद सुरु आहे त्यावर काही तरी भाष्य करणारा चित्रपट तयार करण्याची योजना यशराज आखत होते. तेव्हा विजय कृष्ण आचार्यने ‘धर्मपुत्र’वर आधारित चित्रपटाची कल्पना मांडली आणि आता त्यावर चित्रपट तयार केला जाणार आहे. मात्र हा चित्रपट आजच्या काळानुरूप तयार केला जाणार असून धार्मिक एकतेचा संदेश देण्याचाही प्रयत्न करणार आहे. मात्र हा चित्रपट गंभीर न बनवता हलक्या फुलक्या घटनांनी भरलेला असणार आहे अशी माहितीही यशराजमधील सूत्रांनी दिली. पुढील वर्षी चित्रपटाचे शूटिंग सुरु केले जाणार असून पुढील वर्षीच चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER