यशोमती ठाकूर यांचा तो हल्ला शरद पवारांवर?

yashomati thakur & sharad Pawar

मुंबई : यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तर आहेतच शिवाय त्या प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षदेखील आहेत. त्यांनी शनिवारी एक टिष्ट्वट करून खळबळ उडवून दिली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वावर टीका-टिप्पणी करण्याचे टाळा असा इशारा त्यांनी दिला. आता हा इशारा आहे कोणाला याची चर्चा लगेच सुरू झाली.

मध्यंतरी, ‘काँग्रेसच्या हातातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारकडून निधी दिला जात नाही’ असा हल्लाबोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना ठाकूर यांनी चव्हाण यांच्या भूमिकेचे समर्थन केले होते. आज काँग्रेस नेतृत्वाबाबतच्या टिप्पणीवर यशोमती ठाकूर यांना का टिष्ट्वट करावे लागले?

त्याची पार्श्वभूमी अशी असल्याचे मानले जाते की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव असल्याचे म्हटले होते. या वक्तव्याबाबत काँग्रेसमध्ये कमालीची नाराजी असल्याचे म्हटले जाते.

अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनी पवार यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेतली.मित्र पक्षाच्या नेत्यांबद्दल काँग्रेस नेतृत्वाकडून कधीही टिप्पणी केली जात नाही. अशावेळी मित्र पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांनीही ते भान जपायला हवे. काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल अशी टिप्पणी करण्याचा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून आताच त्यावर प्रतिक्रिया द्यायला हवी, असे मत काँग्रेसच्या केंद्रीय वर्तुळात व्यक्त झाले.

लगेच यशोमती ठाकूर यांना निरोप पाठविण्यात आला आणि ठाकूर यांनी टिष्ट्वट केले.या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आल्या आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्ष म्हणून आघाडीतील मित्र पक्षांना मी सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे.आघाडी धर्माचे पालन सर्वांनी करावे. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे. निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे, असे ठाकूर यांनी टिष्ट्वटमध्ये नमूद केले आहे.

संजय राऊत आले होते अडचणीत

अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांना तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी भेटत असत असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गेल्या जानेवारीत आयोजित एका कार्यक्रमात केला होता. काँग्रेसने त्याची गंभीर दखल घेत राऊत यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे अशी मागणी केली होती. त्यावर राऊत यांना विधान मागे घेणे भाग पडले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER