यशोमानची अशीही स्वप्नपूर्ती

Yashoman Apte

यशोमान आपटेला (Yashoman Apte) आपण सध्या गाणे ताऱ्यांचे…गाणे साऱ्यांचे (Gaane Taryanche Gaane Saryanche ) या सिंगिंग स्टार रिअॅलिटी शोमध्ये पाहत आहोत. फुलपाखरू मालिकेतील मानस म्हणून घराघरात पोहोचलेल्या यशोमानला सुरेल गळाही आहे हे त्याच्या चाहत्यांनी फुलपाखरू या मालिकेतही पाहिलं होतं. मालिकेतील सगळी गाणी यशोमानच्या आवाजातच होती. अभिनय आणि गाणं असं कॉम्बिनेशन असलेल्या कलाकारांची परंपरा आहेच मनोरंजन क्षेत्रात. त्यामध्ये यशोमानही दाखल झाला आहे. सिंगिंग स्टारच्या मंचावर गेल्या आठवड्यात यशोमानने अजय अतुल यांनी संगीत दिलेलं जोगवा सिनेमातील जीव दंगला…रंगला गुंगला असा …प्रेमाची आस तू हे गाणं गायलं. अजय अतुल यांच्यासमोर हे गाणं गायला मिळावं असं यशोमानचं स्वप्न होतं आणि यानिमित्ताने यशोमानचं स्वप्न पूर्ण झालं. गाण्यासाठी अजय अतुलकडून आलेल्या कमेंटच्या टेन्शनमध्येही यशोमानच्या चेहऱ्यावर स्वप्नपूर्तीचा जो काही आनंद दिसत होता तो वेगळाच होता.

Exclusive- Yashoman Apte, Sharayu Date, Sankarshan Karhade, Ketaki Bhave  Joshi, and others share their 'Singing Star' experience | The Times of Indiaजोगवा हा सिनेमा अनेक अर्थांनी गाजला. जोगत्यांच्या आयुष्यातील एक भावस्पर्शी नस ओळखणाऱ्या या सिनेमाच्या यशाने सुवर्णपदकाची कमाई तर केलीच पण मराठीमध्ये संगीतातही अनेक वेगळे प्रयोग केले. या सिनेमातील जीव दंगला हे गाणं यशोमानच्या खास आवडीचं आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की अजय अतुल या संगीतकार जोडीसमोर त्यांचं हे गाणं गायला मिळावं हे यशोमानचं स्वप्न होतं याचं गुपित कुणी उघडलं. अर्थात हे गुपित सगळ्यांना सांगणारी यशोमानची फुलपाखरू या मालिकेतील सहकलाकार ऋता हीच आहे. ऋता ही या शोची अँकर आहे. जेव्हा यशोमानने त्याची मेंटॉर शरयू दाते हिच्यासोबत जीव दंगला या गाण्याचे सूर छेडले आणि हे गाणं संपल्यानंतर त्याने जेव्हा अजय अतुल यांच्याकडे पाहिले तेव्हा तो खूपच खुश झाला होता. गाण्यावर अजय अतुल यांची प्रतिक्रिया विचारण्यापूर्वीच ऋताने यशोमानच्या स्वप्नपूर्तीचा किस्सा सांगितला. त्याचं असं झालं होतं की फुलपाखरू मालिकेच्या शूटिंगवेळी जेव्हा फ्री वेळ मिळायचा तेव्हा यशोमान मेकरूममध्ये जी गाणी म्हणत बसायचा त्यामध्ये जीव दंगला हे गाणं त्याच्या कायम ओठावर असायचं. ऋताला तो अनेकदा म्हणायचा की हे गाणं मला एकदा अजय आणि अतुल यांच्यासमोर म्हणायचं आहे. त्यांच्याकडून या गाण्यावरची कमेंट ऐकायची आहे. हे माझं स्वप्नं आहे. मग काय, हीच गोष्ट ऋताने यानिमित्ताने ऑनस्टेज सांगायची संधी अजिबात सोडली नाही. यशोमानलाही ऋताकडून त्याच्या स्वप्नाचा किस्सा सांगणं हे सरप्राइज होतं. अर्थात यशोमानने हे गाणं खूप छान गायल्यामुळे अजय अतुल यांच्याकडून त्याला दाद मिळालीच.

मुंबईकर असलेल्या यशोमानने शाळा कॉलेजमध्येच अभिनय, गाणं, गिटार यामध्ये नाव गाजवलं. यूथ फेस्टीव्हलमध्ये कॉलेजला अनेक पुरस्कार मिळवून देण्यात यशोमानचा खूप मोठा वाटा आहे. कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने हौशी रंगभूमीवर मऊ आणि झोपाळा या दोन नाटकांमध्ये काम केलं. ३५ टक्के काठावर पास या सिनेमातून त्याचे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले.. एक कॉलेजबॉय ते जबाबदार मुलगा, काळजी घेणारा नवरा, प्रेमळ बाबा अशा अनेक छटा त्याला फुलपाखरू या मालिकेतील या रोलमध्ये मिळाल्या. यशोमानच्या अभिनय करिअरला ब्रेक देणारी ही मालिका ठरली. या मालिकेत काही रोमँटीक गाण्याचे प्रयोग केले. त्यामध्ये ओढ तुझी छळते मला हे गाणं गाण्याच्या संधीचं यशोमानने सोनं केलं आणि त्याची ही कलादेखील प्रेक्षकांसमोर आली. मालिकेत त्याच्या रूममध्ये तसेच कॉलेज फंक्शनमध्ये हातात दिसणारी गिटारही अनेक सीनमध्ये यशोमानने खरोखर स्वत: वाजवली आहे. .

गाण्यावर त्याचं पहिलं प्रेम असलं तरी अभिनयाच्या व्यापात सूर जरा मागे राहत होते. पण आता सिंगिंग स्टार या नव्या शोच्या निमित्ताने यशोमानला गाण्याचा आनंद मिळत आहे आणि त्याच्या चाहत्यांनाही. या शोसाठी यशोमानला विचारणा झाली तेव्हा त्याने आनंदाने होकार दिला तो मनसोक्त गाता येईल यासाठीच. गाण्यात तो किती पुढे जाऊ शकतो हे पाहण्यासाठीच त्याने या शोमध्ये एन्ट्री केली आहे. अग्गंबाई अरेच्चा या सिनेमातील मन उधाण वाऱ्याचे हे गाणंदेखील यशोमानला खूप आवडतं. लवकरच यशोमान श्रीमंताघरची सून या मालिकेतून चाहत्यांना भेटणार आहे. त्यामुळे यशोमानच्या चाहत्यांना त्याचा अभिनय आणि गाणं दोन्हीही एकाचवेळी पाहण्याची संधी मिळाल्याने त्याचे चाहतेही खूश आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER