यशोमानला हवी अशी बायको

yashoman Apte

सध्या मराठी सेलिब्रिटींमध्ये साखरपुडा करण्याची, लग्नाचे निमंत्रण देण्याची लगबग सुरू आहे. लॉकडाउननंतर अनलॉक झाल्यावर अनेक कलाकारांच्या लग्नाच्या बातम्या येऊन धडकताहेत. इतकच नव्हे तर सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या अनेक मालिकादेखील लग्न या विषयाला वाहून घेतलेल्या आहेत. त्यामुळे मग मराठी टीव्ही जगतातील मोस्ट एलिजिबल बॅचरर्सनाही त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराची स्वप्नं पडली नाही तरच नवल. श्रीमंताघरची सून ही मालिका आणि सिंगिंग स्टार हा शो यामुळे सध्या लोकप्रियतेच्या झोतात असलेल्या यशोमान आपटेनेही त्याला कशी बायको हवी हे सिंगिंग स्टार शोच्या मंचावर सांगून टाकलं. त्याची हटके अपेक्षा ऐकून आता त्याच्या अपेक्षेत फिट बसणाऱ्या कित्येक मुलींना त्याच्यापर्यंत आपलं नाव पोहोचवायला सुरूवात करतील असा पंचही यावेळी शोचे परीक्षक सलील कुलकर्णी यांनी मारला.

यशोमान सिंगिंग स्टार या शोमध्ये नेहमीच त्याच्या दणाकेबाज गाण्याने परीक्षकांनाच नव्हे तर त्याच्या चाहत्यांनाही मस्त ट्रीट देत आहे. त्यात या शोची निवेदक ऋता दुर्गुळे ही यशोमानची ऑनस्क्रिन नायिका असल्याने त्यांची केमिस्ट्रीही छान जुळलेली आहे. ऋता यशोमानला आपटे अशी हाक मारते हेदेखील तिने सांगितले आहे. यशोमानने एखादे गाणे म्हटले की त्या गाण्यावरून ऋता मंचावर यशोमानची नेहमीच फिरकी घेत असते. नुकतेच यशोमानने या मंचावर गालावर खळी डोळ्यात धुंदी हे गाणं म्हटलं. नेहमीप्रमाणेच यशोमानने त्याचं सगळं बेस्ट देत या गाण्यावर टाळ्या घेतल्या. जेव्हा गाणं संपलं तेव्हा ऋतानेही त्याची फिरकी घेण्याची संधी सोडली नाही. ती यशोमानला म्हणाली, गाण्यात तू इतका रमला होतास की आता सांगूनच टाक की गालावर खळी असलेली ती मुलगी कोण आहे जिच्यासाठी तू हे गाणं मनापासून म्हणालास. आधीच्या एका सेगमेंटमध्ये याच शोमध्ये असलेल्या आस्तादने नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होई हे गाणं म्हणत सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणलं होतं. गाणं संपल्यानंतर जेव्हा बेला शेंडे म्हणाली होती, की आस्ताद, हे गाणं फार आतून आलं होतं रे… त्यावर आस्तादने सांगितलं होतं की त्याने हे गाणं त्याच्याशी भांडून माहेरी गेलेल्या बायको स्वप्नालीसाठी म्हटलंय.

यशोमान आणि त्याने म्हटलेल्या गालावर खळी या गाण्याचंही असं काहीतरी बाँडिंग असणार अशी गाठ सोडत ऋताने त्याला प्रश्न विचारलाच. त्यावर यशोमान त्याच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये काहीसा मंद स्मित करत म्हणाला, अजून तरी कुणी नाहीय…पण गालावर खळी असलेली कुणीतरी शोधावी लागेल. यशोमान ज्या अंदाजात हे वाक्य म्हणाला त्यावरूनही त्याच्या सहकलाकार गायक स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया टिपण्यासारख्या होत्याच, पण यावर सलील कुलकर्णी यांनाही शांत बसवलं नाही. यशोमान, तुझं हे वाक्य ऐकून आता कितीतरी मुलींचे जीव भांड्यात पडले असतील की, चला, यशोमानसारख्या देखण्या तरूणाची जोडीदार होण्याची संधी आहे. हा सगळा संवाद सुरू असताना ऋता काही माघार घ्यायला तयार नव्हती. पुन्हा तिने यशोमानची पाठ धरलीच आणि आता सांगून टाक की तुझ्या अपेक्षा काय आहेत. यशोमान आता चांगलाच रंगात आला. तो त्यावेळी म्हणाला, जसे माझे नाव यशोमान हे काहीसे वेगळे आहे. कॉमन नाही. तशीच हटके, वेगळ्या नावाची मुलगी मला जोडीदार म्हणून आवडेल. म्हणजे ज्यांची नावं काहीशी हटके आहेत त्यांना संधी आहे असं म्हणत ऋतानेही यशोमानच्या मनाचे मांडे चांगलेच फुलवले. यशोमानच्या गाण्यानंतर सिंगिंग स्टार शोच्या मंचावर रंगलेल्या या मजामस्तीने यशोमानचे गाल मात्र चांगलेच गुलाबी झाले.

फुलपाखरू या पहिल्याच मालिकेतून हिट झालेला यशोमान आपटे सध्या श्रीमंताघरची सून या मालिकेत रूपल नंदसोबत काम करत आहे. गिटारिस्ट, अभिनेता, गायक असलेल्या यशोमानला सर्वाधिक आकर्षक पुरूष हा सन्मानही दोन वर्षापूर्वी मिळाला होता. त्यामुळे त्याच्या मनात असलेल्या जोडीदाराची अपेक्षा आता जगजाहीर झालेली आहे. लवकरच हटके नावाची मुलगी त्याच्या आयुष्यात आली तर त्याने गायलेल्या गाण्याचे सार्थक होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER