यशोमानने घेतली स्वानंदीची शाळा

Swanandi Tikekar - Yashoman Apte

नुकताच मराठी भाषा गौरवदिन साजरा झाला. या दिनाच्या निमित्ताने सोशल मीडिया वर्तुळात मराठी भाषेचा गौरव करणारे अनेक मेसेज तसेच पोस्ट फिरत होत्या. पण एका दिवसापुरता मराठी भाषेचा अभिमान न बाळगता नेहमीच आपल्या बोलण्यामध्ये व संवादमध्ये मराठी शब्द यावेत आणि दिवसागणिक मराठी शब्दांची भर आपल्या बोलण्यामध्ये पडावी असं सांगणारेदेखील मेसेज होते. यामध्ये कलाकार मंडळी ही मागे नव्हती. पण यामध्ये एक चेहरा असा होता ज्याने फक्त मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने सोशल मीडिया पेजवर पोस्ट टाकून समाधान मानलं नाही तर या निमित्ताने त्याने आपल्या अनेक कलाकार मित्रमंडळींशी संवाद साधून मराठीतील काही म्हणी किंवा इंग्रजी शब्दाला मराठी शब्द कोणते, असे प्रश्न विचारत मराठीचा वर्ग घेतला.

आणि तो चेहरा म्हणजे अभिनेता यशोमान आपटे (Yashoman Apte). यशोमानने अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) हिची अशी काही मराठी शाळा घेतली की स्वानंदीनेही यापुढे नक्कीच बोलण्यामध्ये मराठी शब्दांचा वापर करेन, असं म्हणत यशोमानच्या शाळेत हजेरी लावली. मराठी भाषा गौरवदिनाच्या शुभेच्छा देत इन्स्टा लाईव्हच्या माध्यमातून यशोमान ऑनस्क्रीन आला. अर्थातच एरवी आपण फेसबुक लाईव्ह किंवा इन्स्टा लाईव्ह असं म्हणत असतो; पण मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने यशोमान थेट संवाद साधणार असल्याने त्याने या लाईव्ह शब्दाला थेट चौकट असं नाव दिलं. अर्थात हे त्याचं स्वतःचं नाव होतं आणि अगदी सहज बोलता बोलता त्याला फेसबुक लाईव्हसाठी हे ‘थेट चौकट’ हे नाव सुचलं. त्याच्या या चौकटीत स्वानंदी टिकेकर आली आणि यशोमानने स्वानंदीला काही मराठीतून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

यामध्ये त्याने काही इंग्रजी शब्दांना मराठी शब्द कोणते हे तर विचारलं; पण स्वानंदीची खरी शाळा घेतली ती मराठी अपूर्ण म्हणी सांगून त्या म्हणी पूर्ण करण्याची. यामध्ये यशोमानने स्वानंदीला विचारलं की कावळ्याच्या शापाने कोण मरत नाही ? मात्र या म्हणीच्या उत्तरात स्वानंदी नापास झाली. तिला काही केल्या गाय हे उत्तर आठवलं नाही. मराठी भाषेतल्या अनेक अपूर्ण म्हणी यशोमानने स्वानंदीसमोर बोलून दाखवल्या आणि त्या म्हणी पूर्ण कर, असं सांगितल्यावर मग मात्र स्वानंदीनं कबूल केलं की खरंच मी मराठीत कच्ची आहे. स्वानंदीचं शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं असलं तरी तिची आई आरती टिकेकर ह्या मराठी शास्त्रीय गायिका आहेत; शिवाय तिचे वडील उदय टिकेकर हे मराठीमधील मोठे अभिनेते आहेत. त्यामुळे निश्चितच टिकेकर यांच्या घरात मराठी बोलणं होत असणार यात काही शंका नाही; पण स्वानंदी मात्र मराठीच्या बाबतीत एक पाऊल मागे आहे हे यशोमनने घेतलेल्या शाळेत कळून आलं.

अर्थात स्वानंदीने नम्रपणे हे मान्य करत यापुढे मराठी भाषा अधिकाधिक वापरेन आणि मराठी शब्द जाणून घेईन, असं म्हणत ही शाळा संपवली. यशोमन आणि स्वानंदी यांनी यापूर्वी सिंगिंग स्टार या रियालिटी शोमध्ये एकत्र काम केलं आहे. स्वानंदीलाही अभिनयासोबत गाण्याची आवड आहे; शिवाय तिने गाण्याचे शिक्षण घेतले आहे. यशोमानदेखील जितका चांगला अभिनेता आहे तितकाच तो उत्तम गायकही आहे; शिवाय तो चांगल्या प्रकारे गिटार वाजवतो. स्वानंदी आणि यशोमान या दोघांनाही त्यांच्या कुटुंबीयांकडून अभिनयाचा वारसा मिळालेला आहे. ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यशोमानचे काका असल्यामुळे लहानपणापासून अभिनयाचे बाळकडू त्याला मिळाले आहेत.

पण मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने यशोमानने केलेला हा वेगळा प्रयोग मनोरंजन विश्वात आणि सोशल मीडिया वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे. त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मराठी माध्यमातून झाल्यामुळे त्याचं मराठी खूप उत्तम आहे. इतकंच नव्हे तर मराठी भाषेतील श आणि ष या दोन अक्षरांचा व्यवस्थित उच्चार यशोमानला करता येतो याचंही यानिमित्तानं त्याच्या चाहत्यांनी कौतुक केलं. फक्त मराठी भाषेच्या गौरवार्थ मेसेज किंवा फोटो पोस्ट करण्यापेक्षा यशोमानने ‘मराठी जपा’ हा संदेश सध्याच्या सोशल मीडियासारख्या लोकप्रिय माध्यमातून दिला यासाठी त्याला मराठीप्रेमींनी दाद दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER