चीनच्या विभाजनाचा प्रयत्न करणाऱ्यांना चिरडून टाकू; शी जिनपिंगची धमकी

xi-jinping

काठमांडू : चीनच्या विभाजनाचा प्रयत्न करणाऱ्यांना चिरडून टाकू, अशी धमकी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगची यांनी येथे नेपाळ येथे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्याशी झालेल्या चर्चेत दिली.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की चीनने तिबेटवर अवैध कब्जा केला आहे असा दलाई लामा यांचा आरोप आहे. चीनने हा कब्जा सोडावा अशी दलाई लामांची मागणी आहे. नेपाळ आणि तिबेटची शेकडो किलोमीटर सीमा लागून आहे.

चीनने तिबेट बळकावल्यानंतर दलाई लामांचे नेतृत्व मानणारे २० हजारावर तिबेटी शरणार्थी म्हणून नेपाळमध्ये रहात आहेत.

याशिवाय, दलाई लामांचे अडीच – तीन हजार भक्त दरवर्षी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तिबेटमधून नेपाळमार्गे धर्मशाळा येथे जात असतात. हे चीनला बोचते. नेपाळमध्ये राहणाऱ्या तिबेटी शरणार्थींना नेपाळने चीनकडे प्रत्यार्पित करावे, अशीही चीनची इच्छा आहे. यासाठी चीन नेपाळसोबत प्रत्यार्पण संधी करण्याचा प्रयत्न करतो आहे. या संधीवर नेपाळने आढेवेढे न घेता स्वाक्षरी करावी यासाठी शी जिनपिंग यांनी ‘चिरडण्याची’ धमकी देऊन नेपाळला समज दिली.

यानंतर नेपाळच्या पंतप्रधानानी म्हटले आहे की – आम्ही चीनच्या संप्रभुता आणि क्षेत्रीय अखंडतेचे समर्थन करतो. ‘एक चीन’ धोरणाला आमचा पाठिंबा आहे. नेपाळ ताइवानला चीनचा भाग आणि तिबेटला चीनचा अंतर्गत प्रश्न मानतो.
भारताने तिबेटचे बौद्ध धर्मगुरू दलाईलामा याना शरण दिले आहे. ते धर्मशाळा येथे राहतात. भारताने तिबेटच्या निर्वासित सरकारला पाठिंबा दिला आहे, हे उल्लेखनीय.