ग्रामीण रुग्णालयात क्ष-किरण विभागात काम करणाऱ्या तंत्रज्ञास कोरोनाची लागण

Corona Positive

पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात क्ष-किरण विभागात काम करणाऱ्या तंत्रज्ञास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या तंत्रज्ञाच्या संपर्कात आलेले सुमारे दहा ते बारा कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे घशांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

पालघर ग्रामीण रुग्णालय हे समर्पित कोरोना उपचार केंद्र म्हणून कार्यरत आहे. खबरदारी म्हणून येथील कर्मचाऱ्यांना पालघर शहरातील एका लॉजमध्ये राहण्याची सुविधा करण्यात आली होती. बाधित रुग्ण गेले काही दिवस एका अन्य तंत्रज्ञासोबत राहात होता.

ग्रामीण रुग्णालयातील या कर्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणे दिसून येताच त्यांच्या संपर्कात आलेल्या, ग्रामीण रुग्णालयातील अनेकांना अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांचा तपासणी अहवाल येईपर्यंत त्यांना अलगीकरणातच राहण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्याची माहिती पुढे आली आहे.

तसेच शहरातील टेंभोडे येथील गणेशनगरस्थित एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या २७ जणांची तपासणी करण्यात येत आहे. पालघर शहरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER