मोदींना पत्र लिहिने विद्यार्थ्यांना भोवले; ६ विद्यार्थी निलंबित

वर्धा : आपल्या विरोधात किंवा आपण घेत असलेल्या निर्णयाच्या विरोधात मोदी कारवाई करतात हे ऐकिवात होते. मात्र हे सत्य असल्याचा प्रत्यय विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आला. देशातील सध्याची स्थिती व काश्मीर प्रश्नावर मोदी यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना वर्धामधील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी निलंबित केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

देशातील झुंडबळी (मॉब लिंचिंग) घटनेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले म्हणून ५० जणांविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. असे असताना आता देशातील सध्याची स्थिती व काश्मीर प्रश्नावर मोदी यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. वर्धामधील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असा खुलासा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.

निलंबित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चंदन सरोज (एम. फील, सोशल वर्क), नीरज कुमार (पीएचडी अँड पीस स्टडीज), राजेश सारथी आणि रजनीश आंबेडकर (वुमेन स्टडी), पंकज वेला (एम. फिल), वैभव पिंपळकर (डिप्लोमा, वुमेन्स स्टडीज डिपार्टमेंट) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व निलंबित विद्यार्थी हे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील स्त्री अध्ययन विभागातील आहेत.

विद्यापीठ परिसरात बसपाचे संस्थापक कांशीराम यांची जयंती साजरी करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे परवानगी मागितली होती. परंतु, विद्यापीठाने ती नाकारली. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली. त्यानंतर विद्यापीठाच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे पंतप्रधानांना पत्र लिहिले. विद्यापीठात सर्व कार्यक्रमांना परवानगी मिळते. मग कांशीराम यांच्या जयंतीसाठी परवानगी का नाकारण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करीत विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला.

देशातील मॉब लिंचिंग घटनेविरोधात आवाज उठवणाऱ्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणाऱ्या बॉलिवूडसह अन्य इंडस्ट्रीजमधील जवळपास ५० जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, यानंतर सर्वच स्तरांतून टीका होऊ लागल्याने या ५० जणांविरोधातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश मुझफ्फरपूरच्या पोलीस अधीक्षकांनी दिले होते. तर आता या वृद्धाच्या विद्यार्थ्यांचे काय होणार हे कुणास ठाऊक?