रेल्वे रुळांवर मृत्यू कसा? आता ‘यांचा’ अहवाल ठरणार महत्त्वाचा!

मुंबई : रेल्वे रुळांवर दरवर्षी रेल्वेखाली चिरडून अनेकांचे मृत्यू होतात. त्यानंतर मृत व्यक्तींच्या कुटुंबियांतर्फे नुकसान भरपाईचे दावे ‘रेल्वे दावे लवादा’त (रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनल) दाखल होतात. संबंधित व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे ती व्यक्ती रेल्वेखाली आली की त्याने खरोखरच आत्महत्या केली वा तो रेल्वेच्या गलथापणामुळे झालेला अपघात होता? या प्रश्नाचे नेमके उत्तर काय? या संदर्भात रेल्वे प्रशासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. घडलेल्या घटनेला रेल्वे कारणीभूत आहे की आत्महत्या करणारी व्यक्ती, हे मोटरमन वा मोटरवूमनच सांगू शकतील, असे रेल्वेचे म्हणणे आहे.

दरवर्षी पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभागाला अपघात आणि दुर्घटनाविषयक सुमारे २०० दावे हाताळावे लागतात. सध्या लवादापुढे पाच हजारांवर दावे प्रलंबित आहेत.यातील २० टक्के खोटे असल्याचे सिद्ध होतात वा फेटाळले जातात, अशी माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे रेल्वेने मोटरमन वा मोटरवूमन यांच्या जबानी आणि लेखी अहवालावर विश्वास दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पश्चिम रेल्वेने सर्व मोटरमन आणि मोटरवूमनला पत्र पाठविले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण तेच सांगू शकतील, असा विश्वास पश्चिम रेल्वेने या पत्रात व्यक्त केला आहे.