परतीच्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल

worried due toReturn-rains-lashed-paddy-fields-farmers

सांगली : पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने गेल्या चोवीस तासात दमदार सुरूवात केली आहे. खरीपाची काढणी लांबणार आहे. भात, भुईमूग, सोयाबिन, बाजरी, मका ही प्रामुख्याने खरीपातील कापणीला आलेली पिके धोक्यात आली आहेत. पावसाचा परतीचा प्रवास लवकर पूर्ण व्हावा याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.

वादळी पावसाने शनिवारी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक भागांना झोडपून काढले. गेले काही दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने आता पाऊस गेला म्हणून बेसावध असलेल्या बळीराजाची यामुळे त्रेधा उडवली.भात, भुईमूग, सोयाबिन, नाचणी काढणीच्या पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात परतीचा पाऊस कोसळत आहे. पुढील चार दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला नारंगी इशारा देण्यात आला आहे.परिणामी घाट माथ्यावरील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात ही मोठ्या पावसाची शक्यता आहे.

येत्या पंधरा दिवसात खरीप पिके काढणीची लगबग सुरू होईल. परतीचा पाऊस लांबल्याने याचा काढणीवर परिणाम होणार आहे. आडसाली उसाच्या लागणीही थांबल्या आहेत. वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस कोसळत असल्याने ऊस अक्षरश: झोपला आहे. पडलेल्या ऊसामुळे टनेज घटून शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे. भात, सोयाबिन, ज्वारी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पावसामुळे शेतात घात येण्यास विलंब होणार आहे. परिणामी यामुळे रब्बीचा हंगामही लांबण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER