World water day – शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने जल विचार !

World Water Day

२२ मार्च हा World water day म्हणून साजरा केला जातो. पाणी किती आवश्यक आहे. पाण्याशिवाय प्राणी वृक्ष जगू शकत नाही हे वेगळे सांगायला नको. शरीर स्वास्थ्याकरीता भरपूर पाणी प्यावे हा विचार तर इतका बिंबवला जातोय की गरज नसतांना पाणी पिण्याची एक सवयच झाली आहे. आयुर्वेदानुसार जसे आहाराचे पचन झाल्यावरच शरीर पोषण होते त्याप्रमाणे पाण्याचेही पचन होणे गरजेचे आहे. मनुष्याला तहान लागली असतांना पुष्कळ प्रमाणात पाणी गटगट पिल्या जाते परंतु त्यामुळे कफ व पित्त दोष प्रकुपित होतात. म्हणूनच खूप तहान लागल्यास थोडे थोडे पाणी प्यावे. त्यामुळे तहानेचे शमन होते. तहान नसतांना उगीचच पाणी पिण्याने आमदोष, तंद्रा, पोट फुगणे, खोकला, अग्निमांद्य, मळमळ, श्वास, नाक वाहणे हे विकार होतात. हा आयुर्वेदाचा दृष्टीकोण आजकाल निर्माण होणाऱ्या विकारांमधे खूप महत्त्वाचा आहे. अल्प मात्रेत मधून मधून पाणी पिणे आयुष्य निरोगी राहण्याकरीता गरजेचे आहे. शरद व ग्रीष्म ऋतुत उष्ण हवामानामुळे साहजिकच तहान जास्त लागते. परंतु या व्यतिरिक्त इतर ऋतुत मधून मधून थोडे थोडे पाणी प्यावे.

  • आटवलेले पाणी हे स्वास्थ्यकारक आहे. परंतु आटवलेल शिळे पाणी हानीकारक, रोगोत्पादन करणारे आहे.
  • आयुर्वेदात काही आजारांमधे कच्चे साधे पाणी पिऊ नये असे सांगितले आहे. उदा. अतिसार, अर्श, विद्रधी, शोथ, ग्रहणी इ. यात कच्चे पाणी पिऊ नये. या व्याधीच्या अनुसार औषधांनी सिद्ध केलेले पाणीच प्यावे.
  • ज्वर, आध्मान( पोट फुगणे) कफविकार, दमा, नाक वाहणे, लठ्ठपणा, मूत्रविकार यात पाण्याचा अर्धा भाग आटवून ( १/२ भाग) अर्धे पाणी शिल्लक राहिलेले पाणी प्यावे. असे अर्धावशेष पाणी जाठराग्नि प्रदीप्त करणारे, पाचन करणारे, हलके आणि मूत्राशयाचे शोधन करणारे आहे.
  • थंड ( माठातील) पाणी ग्लानी दूर करणारे, दाहशामक ( उष्ण ऋतुमुळे झालेला असो वा उष्ण मसालेयुक्त आहाराने), श्रमहर, रक्तपित्त- विष यांचा नाश करणारे आहे.

एक जुने प्रसिद्ध हिंदी गाणे नक्कीच सर्वांना आठवत असेल – पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो लगे उस जैसा ! खरंच आहे. स्वास्थ्याच्या दृष्टीने पाण्याच्या संयोगाने गुण परीवर्तन होते. चांदी, माती,तांब्यांच्या पेल्यातील पाण्याचे गुणधर्म बदलतात. वाळा घातलेले पाणी थंडावा आणते तर मध पाणी मेदोहर लठ्ठपणा कमी करणारे आहे. सुंठ नागरमोथा घातलेले पाणी पाचक आहे. स्थान ऋतु देशपरत्त्वे पाण्याचे गुण बदलतात. विहिर नदी सरोवर समुद्र नाभस जलाचे चव, गुण वेगवेगळे होतात.

असे हे जल माहात्म्य जागतिक जल दिनाच्या निमित्ताने!

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER