कसोटी विश्व अजिंक्यपद अंतिम सामना कोरोनामुळे संकटात, ब्रिटनने घातली बंधने

ब्रिटनने (Britain) भारतातून (India) येणाऱ्या प्रवाशांना निर्बंध लादल्याने आणि त्यांना 10 दिवसांचे विलगीकरण (Quarantine) बंधनकारक केल्याने भारतीय क्रिकेट संघाच्या (cricket) आयपीएलनंतरच्या (IPL) सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय क्रिकेट संघाला जूनमध्ये साउथम्पटन येथे कसोटी क्रिकेटच्या विश्व अजिंक्यपद (World Test championship) स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे आणि त्यानंतर आॕगस्टमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

ब्रिटनमध्ये प्रवेशासाठी प्रतिबंधीत यादीत पाकिस्तानसुध्दा आहे. पाकिस्तानी संघसुध्दा इंग्लंडमध्ये वन डे आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे तर भारताचा महिला क्रिकेट संघसुध्दा जूनमध्ये मालिका खेळणार आहे.

कोरोनाच्या नव्या विषाणूच्या प्रसाराच्या भीतीने ब्रिटीश सरकारने भारताकडून येणाऱ्या प्रवाशांना प्रतिबंधीत यादीत टाकले आहे. त्यामुळे ही समस्या उत्पन्न झाली आहे. असे असले तरी इंग्लंड क्रिकेट मंडळ (इसीबी) ने सामन्यांचे वेळापत्रक खंडीत होणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे.

नव्या नियमानुसार ज्या व्यक्ती गेल्या 10 दिवसांपासून भारतात आहेत त्यांना शुक्रवारी पहाटे 4 वाजेपासून ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ब्रिटन व आयर्लंडचे रहिवासी, किंवा ज्यांना ब्रिटनमध्ये रहिवासाचा परवाना आहे अशा व्यक्तींना भारतातून आल्यावर 10 दिवस विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. यात खेळाडूंनासुध्दा कोणतीही सवलत नाही.

भारतात कोरोनाचा जो नवा विषाणू दिसून येत आहे त्याचा फैलाव वेगाने होत असून तो लसीकरणालाही दाद देत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॕन्सन यांनी येत्या आठवड्यातील भारत दौरासुध्दा रद्द् केला आहे.

इसीबीला आगामी सर्व मालिकांचे आयोजन करायचे असेल तर ब्रिटन सरकारची परवानगी लागणार आहे आणि ती परवानगी मिळेल अशी त्यांना आशा आहे.

गेल्यावर्षीसुध्दा कोरोनाच्या साथीत इंग्लंडमध्येच सर्वप्रथम क्रिकेट सामने खेळले गेले होते. त्यामुळे इसीबीला ही परिस्थिती योग्यरित्या हाताळण्याचा अनुभव आपल्याकडे असल्याचे वाटते. त्यांनी सुरक्षित बायोबबल व सर्व प्रकारची खबरदारी घेत सामने आयोजित करून ब्रिटीश सरकारचा विश्वास जिंकला होता.

दरम्यान बरेच आंतरराष्ट्रीय खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी असल्याने आयपीएलनंतर लगेचच होणारे सामने प्रभावीत होणार आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंडदरम्यानची मालिका 2 जूनपासून सुरू होणार आहे,आणि आयपीएलचा अंतिम सामना 30 मे रोजी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button