ऑलिम्पिकसाठी जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलली

जलतरणाच्या जागतिक स्पर्धांच्यासुध्दा नव्या तारखांवर विचार सुरू

olympic

पॅरिस : टोकियो ऑलिम्पिक आता २०२१ मध्ये २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान होणार असल्याने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे तर जलतरणाचीही जागतिक अजिंक्यपद स्पर्धा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२१ मध्ये ६ ते १५ ऑगस्टदरम्यान युजीन, ओरेगाॕन येथे होणार होती तर जलतरण स्पर्धा १६ जुलै ते १ ऑगस्ट २०२१ दरम्यान जपानमधील फुकुओका येथे नियोजित आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर होताच वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्सने त्यांच्या जागतिक स्पर्धा २०२२ पर्यंत पुढे ढकलल्याचा निर्णय जाहीर केला.

ऑलिम्पिकच्या नव्या तारखांना आमचे समर्थन आहे. आमच्या खेळाडूंना यामुळे सराव व तयारीसाठी वेळ मिळणार आहे. प्रत्येकाने बदलांसाठी आणि तडजोडीसाठी तयार राहायला हवे आणि त्या दृष्टीने आम्ही आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या नव्या तारखांबाबत आयोजकांशी चर्चा करत आहोत, असे वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्सने म्हटले आहे. त्यासोबतच राष्ट्रकुल सामने महासंघ आणि युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजकांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघानेसुद्धा (फिना) ऑलिम्पिकच्या नव्या तारखांचे स्वागत केले आहे. हे स्वागत करतानाच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या नव्या तारखांवर विचार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आॉलिम्पिक सामन्यांमध्ये अ‍ॅथलेटिक्स व जलतरणाच्या स्पर्धा यांना सर्वाधिक प्रेक्षक लाभतात.