विश्वचषक हॉकी स्पर्धा फ्रान्सचा अॉलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाला धक्का

स्पेनसाठी विश्वचषक संपला अर्जेंटिना व फ्रान्सला क्राॕसओव्हरद्वारे संधी

World Cup Hockey

भुवनेश्वर :- चौदाव्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकालात गुरुवारी फ्रान्सने अॉलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का दिला. या निकालाचा फटका स्पेनला बसला असून ‘अ’ गटातून ते आता बाद झाले आहेत. दुसऱ्या सामन्यात स्पेनला न्यूझीलंडने २-२ असे बरोबरीत रोखले. अ गटातून अर्जेंटिनाने दोन विजयांच्या सहा गुणांसह उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले आहे तर प्रत्येकी चार गूण कमावलेल्या फ्रान्स आणि न्यूझीलंडला क्रॉसओव्हर सामन्यांतून अजूनही संंधी आहे.

फ्रान्सचा संघ २८ वर्षानंतर विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला असून क्रमवारीत ते बऱ्याच खाली आहेत. मात्र त्यांनी अॉलिम्पिक विजेत्या आणि गेल्या विश्वचषकातील कास्यपदक विजेत्या अर्जेंटिनाला ५-३ असे नमवून खळबळ उडवून दिली.

या सामन्यात फ्रान्सने मध्यंतरापर्यंतच ४- १ अशी आघाडी घेत धक्कादायक निकालाची चिन्हे दाखवली होती. सामन्याच्या उत्तरार्धात अर्जेंटिनाच्या गोंझालो पिलाट याने पेनल्टी कॉर्नरवर ४४ व ४८ व्या मिनिटाला गोल करुन पराभवाचे अंतर कमी केले.

त्याआधी फ्रान्ससाठी १८ व्या मिनिटाला ह्युगो जिनीस्टेटने मैदानी गोल केला. व्हिक्टर चार्लेटने २३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर ही आघाडी वाढवली. यानंतर तीनच मिनिटात अॕरिस्टाईड कोइस्ने याने फ्रान्सचा तिसरा गोल केला तर दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणात गॕस्पार्ड बॉमगार्टेन याने फ्रान्सची आघाडी ४-० केली. यादरम्यान अर्जेंटिनासाठी लुकास मार्टिनेझने गोल केलेला होता.

World Cup Hockeyफ्रान्सचा पाचवा आणि शेवटचा गोल ५४ व्या मिनिटाला फ्रँकाईस गोयेट याने केला.

दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने स्पेनला बरोबरीत रोखून त्यांच्या सर्व आशा संपुष्टात आणल्या. वास्तविक स्पेनने या सामन्यात ५० व्या मिनिटापर्यंत २-० अशी आघाडी राखली होती. परंतु अखेरच्या दहा मिनिटात त्यांना ती टिकवता आली नाही.

ब्लॕकस्टिक्स म्हणजे न्यूझीलंडच्या हेडन फिलिप्स याने ५० व्या मिनिटाला मैदानी गोल आणि केन रसेलने ५६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन न्यूझीलंडचा पराभव टाळला. त्यामुळे अल्बर्ट बेल्ट्रानचा नवव्या मिनिटाचा मैदानी गोल आणि अल्वारो इग्लेसियासचा २७ व्या मिनिटाचा गोल निष्प्रभ ठरवला.

शुक्रवारचे सामने

अॉस्ट्रेलिया वि. चीन (संध्या. ५ वा)
इंग्लंड वि. आयर्लंड (संध्या. ७ वा)