सुपर ओव्हरमध्ये ‘इंग्लंड सुपर’, जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार

कमनशिबी न्यूझीलंड पुन्हा उपविजेतेच

World cup 2019 England Champ

क्रिकेट विश्वचषक 2019 – लंडन : दोन्ही संघ पहिल्यांदाच जगज्जेतेपदासाठी आतूर, त्यात नियोजीत सामना ‘टाय’, कोंडी फोडायची म्हणून खेळला गेलेला सुपर ओव्हरचा टाय ब्रेकरही ‘टाय’ अशा प्रचंड नाट्यमय घडामोडीत इंग्लंडने रविवारी क्रिकेटच्या मक्केत म्हणजे लॉर्डस्वर आपले विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार केले. सामन्यादरम्यान लगावलेल्या अधिक चौकार-षटकारांच्या निकषाआधारे त्यांनी न्यूझीलंडवर बाजी मारली आणि लागोपाठ तिसºया विश्वचषक स्पर्धेत यजमान संघ विश्वविजेता ठरला. एवढेच नाही तर सलग तिसºया स्पर्धेत गतविजेत्या संघाचे आव्हान संपविणाºया संघाने नव्या विश्वविजेत्याचा मान मिळवला.

ही बातमी पण वाचा : इंग्लंडचा सुपर विजय, पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकल्यावर ८ बाद २४१ धावा केल्या. विश्वचषक अंतिम सामन्यातील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. याच्या उत्तरात योगायोगाने इंग्लंडचा संघही नेमका २४१ धावांतच बाद झाल्याने सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हर खेळविण्यात आले. त्यात इंग्लंडने १५ धावा केल्या आणि न्यूझीलंडला १६ धावांचे लक्ष घेऊन खेळताना शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती. त्यावेळी गुप्तीलला दुसरी धाव घेताना जेसन रॉयच्या थ्रोवर बटलरने धावबाद केले आणि इंग्लंडचा विश्वविजय साकार झाला.

सामन्यादरम्यान इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा अधिक वेळा चेंडू सीमापार धाडल्याने त्यांना विजेतेपद बनवले. या सामन्यात इंग्लंडने २२ चौकार आणि दोन षटकार लगावले होते तर न्यूझीलंडने १४ चौकार व दोन षटकार लगावले. हा फरक महत्त्वाचा ठरला.

या सामन्यादरम्यान न्यूझीलंडने दिलेले चार ओव्हरथ्रो त्यांना अतिशय महागात पडले अन्यथा निर्धारीत षटकांतच त्यांनी सामना जिंकला असता. सामन्याच्या निर्णायक क्षणांमध्ये इंग्लंडला ३ चेंडूंमध्ये नऊ धावा असे समीकरण असताना गुप्तीलच्या थ्रोवर चेंडू थेट सीमापार झाल्याने इंग्लंडला थेट सहा धावा मिळाल्यानेच इंग्लंडला लढत टाय करणे शक्य झाले. त्याच्या आदल्या षटकात बेन स्टोक्सला सीमारेषेवर बोल्टने झेलबाद केलेच होते पण त्याचा पाय सीमारेषेला लागल्याने तो झेलाऐवजी षटकार झाला. याप्रकारे न्यूझीलंडचा संघ पुन्हा पुन्हा दुर्देवी ठरत गेला आणि त्यांना लागोपाठ दुसºयांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

ही बातमी पण वाचा : बाऊंड्री रुलबाबत विल्यम्सन होता अनभिज्ञ, मॉर्गनने करुन ठेवला होता होमवर्क