डूप्लांटीस व रोयास ठरले यंदाचे सर्वोत्तम अॕथलीट

Yulimar Rojas - Armand Duplantis

यंदा विश्वविक्रमी कामगिरी नोंदवणारे अॕथलीट, स्वीडनचा (Sweden) मोंडो डूप्लांटीस (Mondo Duplantis) आणि व्हेनेझुएलाची (Venezuela) युलीमार रोयास ) यांची वर्षातील सर्वोत्तम अॕथलीट म्हणून निवड करण्यात आली आहे. शनिवारी पार पडलेल्या व्हर्च्युअल वर्ल्ड अॕथलेटिक्स अॕवार्डस 2020 ( World Athletics Awards 2020) सोहळ्यात त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला.

डूप्लांटीस याने पोल व्हाॕल्टमध्ये यंदा दोन वेळा विश्वविक्रम करताना 6.17 मीटर व 6.18 मीटरची कामगिरी नोंदवली. फेब्रुवारीत लागोपाठ आठवड्यात ही कामगिरी केल्यावर कोरोनाची साथ कमी झाल्यावर त्याने आऊटडोअरमध्येही 6.15 मीटरची कामगिरी नोंदवली. यंदा सलग 16 स्पर्धात तो अपराजीत आहे. अवघ्या 21 वर्षांचा डूप्लांटीस हा वर्ल्ड अॕथलीट आॕफ दी इयर सन्मान पटकावणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. 2018 मध्ये त्याला रायझींग स्टार सन्मानही मिळाला आहे.

युलीमार रोयास हीसुध्दा यंदा फारच कमी स्पर्धा खेळू शकली पण सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धेवर तिने छाप सोडली. तिने यंदाच्या पहिल्याच स्पर्धेत तिहेरी उडीत दक्षिण अमेरिकेसाठीचा इनडोअर विक्रम केला. मेत्झ, फ्रान्समधील स्पर्धेत तीने 15.03 मीटरची कामगिरी नोंदवली. माद्रिदच्या वर्ल्ड अॕथलेटिक्स इनडोअर टूर स्पर्धेत तिने 15.43 मीटरची कामगिरी करुन इनडोअर ट्रिपल जम्पचा विश्वविक्रम सात सेंटीमीटरने सुधारला होता.

आउटडोअरमध्येही तिनेच यंदाची 14.71 मीटर ही सर्वात लांब उडी नोंदवली आहे. तिला 2017 मध्ये रायझींग स्टार सन्मान देण्यात आला होता.

डुप्लांटीसचे मातापिता हेलेना व ग्रेग डूप्लांटीस यांना प्रशिक्षक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या दोघांच्या प्रशिक्षणातच मोंडोने सात वर्षे वयापासून विविध वयोगटात नवे विक्रम नोंदवले आहेत. हेलेना या हेप्टॕथलीट आहेत तर ग्रेग हे स्वतः पोलव्हाॕल्टचे खेळाडू होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER