उत्‍कृष्‍ट कार्य करत व्‍यवस्‍थापन समित्‍यांनी आदर्श प्रस्‍थापित करावा : सुधीर मुनगंटीवार

Sudhir-Mungantiwar

नागपूर : जैव विविधता तसेच जैविक संसाधानबाबत वैज्ञानिक माहीती नागरिक, विद्यार्थी, शिक्षक अशा सर्वच घटकांना मिळावी या दृष्‍टीने बंगलोरच्‍या, कोलकताच्‍या धर्तीवर चंद्रपूर जिल्‍हयातील विसापूर येथे बॉटनिकल गार्डन तयार करण्‍यात येत आहे. अशाच पध्‍दतीचे बॉटनिकल गार्डन संपूर्ण राज्‍यात तयार करण्‍यात यावे. यासंबंधिचे प्रस्‍ताव शासनाला प्राप्‍त झाल्‍यास त्‍यावर निश्चितपणे योग्‍य विचार करण्‍यात येईल. नाग‍री क्षेत्रात स्‍थापना झालेल्‍या जैवविविधता व्‍यवस्‍थापन समित्‍यांनी संवर्धनाचे उत्‍कृष्‍ट कार्य करत राज्‍यासमोर आदर्श प्रस्‍थापित करावा असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

महाराष्‍ट्र राज्‍य जैवविविधता मंडळाच्‍या सातव्‍या वर्धापन दिनानिमित्‍त आयोजित कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नागपूरच्‍या महापौर नंदा जिचकार, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख उमेशकुमार अग्रवाल, जैवविविधता मंडळाचे अध्‍यक्ष डॉ. विलास बर्डेकर, सदस्‍य सचिव अश्रफ, डॉ. आर. पी. शनवारे, डॉ. जयंत वडतकर, डॉ. अधिकराव जाधव आदी प्रामुख्‍याने उपस्थित होते.

मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, जैवविविधता संवर्धानाबाबत मंडळाने गेल्‍या सात वर्षात उल्‍ले‍खनिय कामगीरी केली आहे. जैविक संसाधनाच्‍या व्‍यावसायीक वापरातुन होणारा आर्थिक लाभ समित्‍यांना होणे गरजेचे आहे. जैवविविधते संदर्भात जे पांरपरिक वाण आहेत, ते लुप्‍त होण्‍याच्‍या मार्गावर आहेत. अशा वाणाचे संवर्धन करण्‍यासाठी जागतिक दर्जाची सिड बँक तयार करावी आणि या संदर्भात आराखडे तयार करून प्रस्‍ताव शासनाला पाठवावे. जैवविविधता सवंर्धानाच्‍या प्रक्रियेत निधिची कमतरता भासणार नाही अशी ग्‍वाही त्‍यांनी बोलतांना दिली.

प्रधान सचिव विकास खारगे यांनी जैवविविधता मंडळाच्‍या कार्याचे कौतुक केले. 50 कोटी वृक्ष लागवड, महाराष्‍ट्र राज्‍य रणनिती व कृती आराखडा, जैवविविधता अधिनियमाची वैशिष्‍टये, त्‍या अंतर्गत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांना मिळणारे फायदे, सागरी किना-यावरील जैवविविधता याबाबत आपले विचार विकास खारगे यांनी व्‍यक्‍त केले.

यावेळी विविध विभागांनी उभारलेल्‍या स्‍टॉल्‍सचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची 7 वर्षातील सोनेरी वाटचाल या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. दरम्यान दत्तात्रय पाटील, वनपाल, यांनी लिहिलेल्या तसेच निनाद खांडेकर यांनी संगीत दिलेल्या जैवविविधता पोवाडा चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. जैवविविधता मंडळाचे अशरफ यांनी प्रास्‍ताविक केले.