१० वर्षांनी सुरू झाले ‘गदर’च्या सिक्वेलचे काम

Gadar- Ek Prem Katha

हिंदी सिनेमांसाठी भारत-पाकिस्तानमधील वाद हा एक हमखास यशस्वी फॉर्म्यूला आहे. अनेक निर्मात्यांनी या विषयाला धरून सिनेमे तयार केले आहेत. पण ते सगळेच यशस्वी ठरतात असेही नाही. काही जण फक्त नावाला हा वाद घेतात आणि भलतेच काही तरी दाखवत असतात. यापूर्वीही असे घडले आहे, आताही घडत आहे आणि यापुढेही घडेलच यात शंका नाही. मात्र असे असले तरी काही निर्मात्यांनी खरोखरच या विषयावर चांगले आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी सिनेमे तयार केले आहेत. या काही सिनेमांपैकीच एक सिनेमा आहे गदर- एक प्रेमकथा. (Gadar: Ek Prem Katha) बॉक्स ऑफिसवर सुपरहिट आणि कमाईचा विक्रम करणाऱ्या या सिनेमाचा सिक्वेल येणार असे सतत म्हटले जात होते. पण काही झाले नव्हते. मात्र आता स्वतः दिग्दर्शकानेच सिक्वेलवर काम सुरु केल्याची माहिती दिली आहे.

२००१ मध्ये दिग्दर्शक अनिल शर्माने सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांना घेऊन गदर- एक प्रेमकथा सिनेमा तयार केला होता. या सिनेमाची निर्मिती झी ने केली होती. रिलीज झाल्यानंतर या सिनेमाने प्रेक्षकांवर गारूड केले होते. सनी देओलचे डायलॉग्ज आणि त्याची अॅक्शन, देशप्रेम यामुळे प्रेक्षक भारावला आणि सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम करीत २००१ मधील सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला. सिनेमा यशस्वी झाल्याने लगेचच या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. तेव्हा बोलताना अनिल शर्माने सांगितले होते, सिक्वेल बनवण्याचा विचार आहे पण अजून काही निश्चित ठरलेेले नाही. त्यानंतर अधून मधून सिक्वेलची चर्चा व्हायची पण नंतर सगळे थंड व्हायचे.

मात्र आता सिक्वेलवर काम सुरु झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अनिल शर्माला विचारले असता त्याने सांगितले, सध्या मी अपने २ च्या तयारीत व्यस्त आहे. या सिनेमात देओल कुटुंबाच्या धर्मेंद्र, सनी, बॉबी आणि सनीचा मुलगा करण अशा तीन पिढ्या एकत्र काम करताना दिसणार आहे. यासोबतच गदरच्या सिक्वेलवरही चर्चा सुरु केली आहे. हा सिक्वेल आम्ही तयार करणारच आहोत. मात्र योग्य वेळ येताच याची अधिकृत घोषणाही करू. सध्या सिनेमाचा प्लॉट आणि स्क्रिप्टवर चर्चा सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच आम्ही सिनेमाची घोषणा करू. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गदरच्या सिक्वेलमध्ये सनी देओल, अमीषा पटेल यांच्याच मुख्य भूमिका असणार आहेत. तसेच गदरमध्ये त्यांच्या मुलाची भूमिका करणारा उत्कर्ष शर्मा आता मोठा झाला असून तो यात मुख्य नायकाची भूमिका साकारणार आहे. उत्कर्ष हा अनिल शर्मा यांचाच मुलगा असून २०१८ मध्ये त्याने ‘जीनियस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये नायक म्हणून प्रवेश केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER