महिला टी-20 विश्वचषक; शेफाली वर्मा सामन्यातील सर्वात कमी वयाची सर्वोत्कृष्ट खेळाडू

Shefali Verma youngest player

महिला क्रिकेटमध्ये कमी वयात विक्रमांचा धडाका लावून महिला क्रिकेटची सचिन तेंडूलकर अशी प्रसिध्दी पावलेली शेफाली वर्मा हिने आणखी एक विक्रम केला आहे. महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील ती सर्वात कमी वयाची सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली आहे. 24 फेब्रुवारीला पर्थ येथे बांगलादेशविरुध्दच्या विजयावेळी तिने हा विक्रम केला. या सामन्यावेळी 16 वर्ष 27 दिवस वयातच ती ‘प्लेयर आॕफ दि मॕच’ ठरली.

महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता तिच्यापेक्षा कमी वयात दक्षिण आफ्रिकेची डेन व्हॕन निकर्क ही प्लेयर आॕफ दी मॕच ठरली होती. मात्र डेनचा विक्रम हा वन डे सामन्यातील होता. 2009 मध्ये वन डे विश्वचषक स्पर्धेत ती केवळ 15 वर्ष 304 दिवस वयात प्लेयर आॕफ दी मॕच ठरली होती.

पर्थ येथे भारताने बांगलादेशवर 18 धावांनी विजय मिळवला. त्या सामन्यात शेफालीने फक्त 17 चेंडूतच चार षटकार आणि दोन चौकारांसह 39 धावा फटकावून काढल्या होत्या आणि जेमिमा रॉड्रिक्ससोबत भारताचा विजय सोपा केला होता.

शेफालीच्या नावावर आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम आहे. तिने वेस्ट इंडिजविरुध्द सेंट ल्युसिया येथे गेल्यावर्षी 15 वर्ष 285 दिवस वय असतानाच टी-20 सामन्यात अर्धशतक केले होते. त्यावेळी तिने 49 चेंडूतच 73 धावांची खेळी केली होती. शेफालीने 15 वर्ष 285 दिवस वयातच अर्धशतक झळकावले तर सचिन तेंडूलकरने 16 वर्ष 214 दिवस वयात पहिले अर्धशतक केले होते.

महिला क्रिकेटमध्ये हिदर नाईटने गाठला मैलाचा दगड