महिला राष्ट्रीय कबड्डी : हरीयाणाचा धुव्वा उडवीत भारतीय रेल्वेने पटकाविले अजिंक्यपद

Women's National Kabaddi

मुंबई :- भारतीय रेल्वेने गतवर्षीं तब्बल ३४ वर्षांनंतर पराभवाची चव चाखली होती. यंदा हीच बाब रेल्वेच्या चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यांनी हरियाणाचा धुव्वा उडवीत “६६ व्या महिला राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेत यंदाचे विजेतेपद पटकावले.

“६६ व्या महिला राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेत हरियाणाचा धुव्वा उडवीत गतवर्षी पटरीवरून घसरलेली गाडी पुन्हा एकदा रुळावर आणली. पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पटणा येथे आज झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात रेल्वेने हरीयाणाला ४८-२३ असे धुवून काढत पुन्हा एकदा दणक्यात विजयोत्सव साजरा केला. गतवर्षी त्यांना अंतिम फेरीत हिमाचल प्रदेशकडून पराभव पत्करावा लागला होता. १९८३ पासून २०१७ पर्यंत तीन तपापेक्षा अधिक काळ सलग विजेतेपद मिळविणाऱ्या रेल्वेला हा पराभव जिव्हारी लागला. त्याचा वचपा त्यांनी हरीयाणाला सहज पराभव करून काढला. महाराष्ट्रातील रोहा-रायगड येथे जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या “६६ व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेत रेल्वेच्या पुरुषांनी देखिल विजेतेपद मिळविले होते. रेल्वेने या वर्षात दुहेरी मुकुट प्राप्त केला.

भारतीय रेल्वेने सुरुवात एवढ्या धडाक्यात केली की पूर्वार्धातच दोन लोण देत २३-१३ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात पुन्हा एकदा दोन लोण देत एकतर्फी विजय साजरा केला. या ४८ गुणात त्यांनी एकूण ४ लोण देत ८ गुण व अवघा १ बोनस गुण मिळविला. उर्वरित ३९ गुण हे झटापटीतून मिळविले आहेत. हरीयाणा लोणची परतफेड करू शकले नाही. मात्र त्यांनी पूर्वार्धात एक अव्वल पकड करीत २ गुण, तर पूर्वार्धात ७ बोनस आणि उत्तरार्धात ३ बोनस करीत एकूण १० गुण मिळविले.

रेल्वेच्या विजयात एक दुःखाची बाब घडली. त्यांची बोनसची हुकमी खेळाडू सोनाली शिंगटे हिच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यामुळे उपांत्य व अंतिम सामना ती खेळू शकली नाही. अन्यथा गुणांची स्थिती काही वेगळी असती. रेल्वेच्या या विजयाने त्यांची विजयी परंपरा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.