‘ती’ महिलांच्या हेल्मेट जनजागृतीसाठी करणार भारत यात्रा

Helmet women tour

नागपूर :-एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. असे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी म्हटले होते. यासाठी त्यांनी आधी महिलांना शिक्षित केले. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव एकटीच बाईकवर देशाच्या यात्रेवर निघाली आहे.

भारतात दर दिवसाला विना हेल्मेट चालविणाऱ्या सुमारे ९८ दुचाकीस्वारांचा मृत्यू होतो. ही संख्या वाढत आहे. यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पूजाने पुढाकार घेतला आहे. बुधवारी ती नागपुरात आली असता ‘जनआक्रोश’च्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

पूजा हिला लहानपणापासूनच ‘बाईक’चे वेड होते. काही वर्षांपूर्वी तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यांनी हेल्मेट घातले असते तर वाचले असते. या घटनेने मैत्रिणीचे अख्खे कुटुंब रस्त्यावर आले. तेव्हापासून हेल्मेटविषयी जनजागृती करण्याची पूजाची इच्छा होती. पतीकडून मिळालेले प्रोत्साहन व एका ‘एनजीओ’च्या मदतीने महिलांमध्ये हेल्मेट जनजागृतीसाठी २० नोव्हेंबरपासून तिने ‘मिशन हेल्मेट’ हाती घेतले. नोएडा येथून हे ‘मिशन’ सुरू झाले.
बुधवारी सकाळी पूजाचे नागपुरात आगमन होताच जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड यांनी सत्कार केला. यावेळी सचिव रवींद्र कासखेडीकर, डॉ. सुनीती देव, दिलीप मुक्केवार, प्रमेश शहारे, अशोक करंदीकर, कृष्णकुमार वर्मा, डॉ. प्रवीण लाड व जनआक्रोशचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.