
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अजित पवार (Ajit Pawar) यांनी महिलांना मोठे गिफ्ट दिले. अर्थमंत्र्यांनी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत कोणतेही कुटुंब घर विकत घेईल, तेव्हा महिलेच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) सूट दिली जाणार. याची माहिती लवकरच जाहीर होईल. याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२१ पासून करण्यात येईल, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
“महिलाच घरची गृहलक्ष्मी असते, असे म्हणतो. गृहस्वामिनी खऱ्या अर्थाने तेव्हाच ओळखली जाईल, जेव्हा तिचा नवी घर असेल. त्यामुळे आज महिला दिनाचे औचित्यसाधून राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा करत आहे.” असे अजित पवार म्हणाले. योजनेअंतर्गत कुटुंबातील महिलेच्या नावाने घर विकत घेतले जाणार असेल, तर स्टॅम्प ड्युटीत सूट देण्यात येईल. या योजनेबाबत लवकरच सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल, असे पवारांनी अधिवेशनात सांगितले.
विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास
सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत प्रवास करता यावा, यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना सुरु करण्यात येत असून याअंतर्गत बारावीपर्यंतच्या विद्यार्थिंनीना मोफत बस प्रवास करता येईल, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. शाळकरी मुलींच्या प्रवासासाठी १ हजार ५०० पर्यावरणपूरक हायब्रीड बसेस उपलब्ध करून दिल्या जाईल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला