घरगुती हिंसाचाराविरोधात फ्रान्समध्ये महिलांची निदर्शने

France Deadly Domestic Violence

फ्रान्समध्ये महिलांविरोधातील घरगुती हिंसाचाराच्या निषेधात महिलांनी शनिवारी पॅरिससह विविध शहरात मोर्चे काढले. या हिंसाचाराविरुद्ध फ्रान्स सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी महिलांनी केली आहे.


पॅरिस : फ्रान्समध्ये महिलांविरोधातील घरगुती हिंसाचाराच्या निषेधात महिलांनी शनिवारी पॅरिससह विविध शहरात मोर्चे काढले. या हिंसाचाराविरुद्ध फ्रान्स सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी महिलांनी केली आहे.

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन म्हणाले की – महिलांविरुद्धची घरगुती हिंसाचाराची समस्या ही फ्रान्ससाठी शरमेची बाब आहे.

हजारो महिलांनी पॅरिस व इतर शहरात रस्त्यावर उतरून शनिवारी मोर्चे काढले. फ्रान्समध्ये दर दोन किंवा तीन दिवसात एका महिलेचा घरगुती हिंसाचारात मृत्यू होतो आहे. आतापर्यंत १३० महिलांचा फ्रान्समध्ये वर्षभरात घरगुती हिंसाचारात मृत्यू झाला आहे, असे सांगण्यात येते.

फ्रान्स सरकारने या प्रश्नावर सोमवारी उपाययोजना करण्याचे सूतोवाच केले होते. त्याआधी पुन्हा या प्रश्नाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मोर्चे काढण्यात आले. घरगुती हिंसाचारात संशयास्पद व्यक्तींच्या बंदुका जप्त करणे, पोलिसांना ही प्रकरणे हाताळण्यासाठी प्रशिक्षण देणे यासह अनेक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. राजकीय पक्ष, संघटना व इतर संस्था यांचा समावेश असलेल्या ‘नॉस टुटीस कलेक्टीव्ह’ या संघटनेने आयोजित केलेल्या मोर्चात हजारो महिलांचा समावेश होता.

लैंगिक हिंसाचार, घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजनांची मागणी या वेळी करण्यात आली. स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान करून पॅरिसमध्ये मोर्चा काढला. लिली, मार्सेली, बोरडक्स, टोल्यूज, रेनेस, स्ट्रासबर्ग येथेही मोठे मोर्चे काढण्यात आले. युरोपमध्ये घरगुती हिंसाचाराचे प्रमाण फ्रान्समध्ये जास्त असून दरवर्षी फ्रान्समध्ये २१३००० महिला जोडीदाराचा शारीरिक व लैंगिक छळ सहन करतात. १८ ते ७५ वयोगटातील १ टक्के महिलांना घरगुती हिंसाचारास तोंड द्यावे लागते.