बॉलिवुडमध्ये महिला दिग्दर्शिकांनीही रोवला आहे झेंडा

Aruna Raje - Fatma Begum

बॉलिवूड म्हणजे स्त्रीच्या सौंदर्याचे दर्शन घडवणारी इंडस्ट्री. पुरुषप्रधान असलेल्या इंडस्ट्रीत पुरुषांचीच मक्तेदारी चालते. अगदी सुरुवातीपासूनच स्त्री केवळ शोभेची वस्तू म्हणूनच इंडस्ट्रीत पाहिली जाते आणि आजही काही चित्र बदलले आहे असे नाही. नायिकांनी केवळ छान छान दिसावे, नायकाच्या छेडझाडीला उत्तर देत त्याच्यावर प्रेम करावे अशीच स्थिती आजही आहे. नायिका मोठ्या प्रमाणावर असल्या तरी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात मात्र महिला फार कमी संख्येने आढळतात. त्यातही तुम्ही कोणाच्या तरी कोण असाल तरच तुम्ही दिग्दर्शिका बनता. मात्र अशा स्थितीतही अनेक महिलांना आपला ठसा बॉलिवूडवर उमटवलेला आहे. बॉलिवूडमधील महत्वाच्या महिला दिग्दर्शिकांवर एक नजर-

दादासाहेब फाळके यांनी जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीचे बीज रोवले त्यानंतर अनेक वर्ष महिला या क्षेत्रात येत नव्हत्या, नाच-गाणे करणे हे चांगल्या घरचे लक्षण मानले जात नव्हते. अशा काळात जेव्हा फातिमा बेगम (Fatma Begum) यांनी दिग्दर्शिका होण्याचे स्वप्न पाहिले तेव्हा तिला सगळ्यांनी वेड्यात काढले होते. महिला काय दिग्दर्शन करणार आणि तिचे कोण ऐकणार असे म्हटले जात होते. पण फातिमा बेगम आपल्या निर्णयावर ठाम होत्या आणि त्यांनी ‘फातिमा फिल्म्स’ची स्थापना करून 1926 मध्ये ‘वीर अभिमन्यू’ चित्रपटाने आपली कारकिर्द सुरु केली. या चित्रपटानंतर त्यांनी ‘बुलबुल-ए-परिस्तान’ (1926), ‘गॉडेस ऑफ लव्ह’ (1927), ‘हीर रांझा’ (1928), ‘चंद्रावली’ (1928), ‘शकुंतला’ (1929), ‘मिलन’ (1929), ‘कनकतारा’ (1929) असे उल्लेखनीय चित्रपट दिग्दर्शित केले. विशेष म्हणजे यापैकी अनेक चित्रपटांच्या कथाही त्यांनीच लिहिल्या होत्या.

यानंतर जद्दनबाई (Jaddanbai) यांनीही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरून आपला ठसा उमटवला. जद्दनबाई यांची आजच्या तरुण पिढीला ओळख करून द्यायची झाली तर त्या नरगिसची आई आणि संजय दत्तच्या आजी होत्या. त्या उत्कृष्ट गायिका, संगीतकार आणि अभिनेत्रीही होत्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यानंतर 1935 मध्ये त्यांनी संगीतकार म्हणून ‘तलाशे हक’ला संगीत दिले. पुढच्याच वर्षी त्या दिग्दर्शनाच उतरल्या आणि 1936 मध्ये ‘मॅडम फॅशन’, ‘हृदय मंथन’, 1937 मध्ये ‘मोती का हार’, ‘जीवन स्वप्न’ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी मोहन बाबूसोबत लग्न केले. लग्नासाठी मोहन बाबू यांनी धर्म बदलला आणि स्वतःचे नाव अब्दुल रशीद ठेवले होते. ‘बरसात’ चित्रपटाची निर्मिती सुरु असतानाच जद्दनबाई यांचे कँसरने निधन झाले.

या दोन महिलानंतर ज्या महिलेने त्या काळात आपला ठसा उमटवला त्या होत्या शोभना समर्थ (Shobhna Samarth). शोभना समर्थही अभिनेत्री होत्या आणि अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयही केला होता. 1950 मध्ये त्यांनी ‘हमारी बेटी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करून दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यानंतर 1960 मध्ये ‘छबीली’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटामध्ये नूतन आणि तनुजा या त्यांच्या मुलींनी अभिनय केला होता.

यानंतर महिला दिग्दर्शिकांचा विचार करायला गेले तर थेट सई परांजपे (Sai Paranjpye) यांचेच नाव डोळ्यासमोर येते. सई परांजपे यांना कलेची जाण होती. त्यांनी अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. ‘स्पर्श’, ‘चश्मे बद्दूर’, ‘कथा’, ‘पपीहा’, ‘साज’ अशा उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. अनेक मालिकाही त्यांनी तयार केल्या होत्या. जवळजवळ सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. एवढेच नव्हे तर त्यांना 2006 मध्ये पद्म भूषणही देण्यात आले होते.

सई परांजपे यांच्याप्रमाणे अरुणा राजे (Aruna Raje) यांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शिका म्हणून आपले नाव कोरले आहे. 1976 मध्ये त्यांनी ‘शक’, 1980 मध्ये ‘गहराई’ आणि 1982 मध्ये ‘सितम’ चित्रपटासाठी त्यांनी पति विकास देसाईंसोबत सह दिग्दर्शन केले. त्यानंतर 1988 मध्ये त्यांनी स्वतंंत्ररित्या ‘रिहाई’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. 1992 मध्ये ‘पतित पावन’, 1996 मध्ये भैरवी, 2004 मध्ये ‘तुम’ आणि 2019 मध्ये ‘फायरब्रॅन्ड’ चे दिग्दर्शन केले. तसेच काही मालिकांचेही त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

याशिवाय दीपा मेहता, कल्पना लाजमी, अपर्णा सेन, पूजा भट्ट, झोया अख्तर, फराह खान, मेघना गुलजार, रीमा कागती या महिला दिग्दर्शिकांनीही बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER